Pune: आम्ही इथले भाई आहोत; धनकवडीत वाहनांची तोडफोड, नागरिकात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 17:15 IST2024-10-13T17:14:40+5:302024-10-13T17:15:09+5:30
काेयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत रिक्षा, मोटारीसह दोन दुचाकी अशा चार वाहनांची तोडफोड केली

Pune: आम्ही इथले भाई आहोत; धनकवडीत वाहनांची तोडफोड, नागरिकात भीतीचे वातावरण
धनकवडी : धनकवडीतील गणेश चौक परिसरात शनिवारी (दि. १२) रात्री टोळक्याने काेयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत रिक्षा, मोटारीसह दोन दुचाकी अशा चार वाहनांची तोडफोड केली. याबाबत सूरज बंडू शेंडकर (वय ५४, रा. शेलार चाळ, गणेश चौक, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शेंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टोळक्यााविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास दुचाकीवरुन टोळके आले. त्यांनी कोयते उगारून दहशत माजविली. आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादी लागणाऱ्या सोडणार नाही, अशी धमकी दिली. या परिसरातील एका तरुणाचा शोध घेण्यासाठी आलेल्या आरोपींनी शेंडकर यांच्या रिक्षाची काच दांडक्या ने फोडली. या भागातील रहिवासी राजेश कुंजीर यांच्या मोटारीची काच फोडली, तसेच दोन दुचाकींची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार पुढील तपास करत आहेत.
वाहनांची तोडफोड सत्र सुरूच
पुण्यात एका बाजूने दिवसाढवळ्या खून, महिलांवरील अत्याचार, ड्रग्स प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. तर दुसरीकडे दहशतीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात गाड्यांच्या तोडफोडीची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. अल्पवयीन मुलेही दहशत माजवतानाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. सद्यस्थितीत नागरिकांची, महिलांची सुरक्षितता हे पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हानच बनले आहे.