वैचारिक विरोधाचा इतिहास आपण विसरतोय : मकरंद साठे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 02:22 PM2020-01-07T14:22:17+5:302020-01-07T14:31:13+5:30
राष्ट्रवादाला विरोध नाही. मात्र , हिंसक वळण लागता कामा नये....
पुणे : पूर्वी नाटकाचा विरोध नाटकाने, कादंबरीचा विरोध कादंबरीने व्हायचा. वैचारिक विरोध करण्याचा इतिहासच आपण विसरत चाललो आहोत. एखादी गोष्ट पटली नाही की मारहाण करायची ही मानसिकता बळावत आहे, हे जेएनयूमधील घटनेने स्पष्ट झाले. आपल्याभोवती राष्ट्रवादाची चौकट बळकट होत चालली आहे. ‘भारत माता की जय’ ही घोषणा देत जेएनयूमध्ये हल्ला होतो. राष्ट्रवादाला विरोध नाही. मात्र , हिंसक वळण लागता कामा नये. आपल्या जाणिवा समृद्ध नसतील, आपण सुजाण नागरिक नसू तर फसवणूक अटळ आहे, अशा शब्दांत नाटककार मकरंद साठे यांनी जेएनयूमधील हल्ल्यावर परखड शब्दांत भाष्य केले.
कलासक्त, पुणे आणि केल्याने भाषांतर या त्रैमासिकातर्फे डॉ. दीप्ती गंगावणे यांनी लिहिलेल्या ‘युरोपीय तत्वज्ञानाच्या पाऊलखुणा’ या पुस्तकाचे प्रकाशन मकरंद साठे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, कलासक्तच्या सुनंदा महाजन आणि आणि अनघा भट उपस्थित होते.
साठे म्हणाले, तत्वचिंतन विरोधाचे महत्व काळाच्या ओघात संपत चालले आहे. तत्वचिंतन केले की विश्लेषण करता येते. तसेच, स्वत:ची चिकित्सा करता येते. त्यासाठी विचार करावा लागतो आणि जबाबदारी वाढते. लोकशाही म्हणवल्या जाणाºया देशात आपण राहतो. मात्र, भारत कसा आहे ते आता कळू लागले आहे. आपण कसे फसवले जातोय, हे सामान्य माणसाला कळले पाहिजे. राष्ट्रवाद या संकल्पनेने आपल्याला भुरळ घातली आहे. अन्यायाच्या चौकटी आपल्याला माहित झाल्या आहेत. मात्र, अजून राष्ट्रवादासारख्या अन्यायाच्या चौकटींची आपल्याला जाणीवच नाही.
डॉ. दीप्ती गंगावणे यांनी लिखाणामागील भूमिका स्पष्ट केली. अंकिता आपटे हिने सूत्रसंचालन केले.
---------------------
सामान्य माणसाच्या नावाखाली एखाद्या लिखाणाचे सामान्यीकरण केले जाते. लेखक चार पावले पुढे आले तर वाचकाने दोन पावले पुढे आले पाहिजे. मला जे कळले नाही ते वाईट कसे? सामान्य माणसाला कळले पाहिजे, अशी मांडणी करण्याचा आपल्याकडे आग्रह धरला जातो. इंग्रजी वाचणारे आणि लिहिणारे यांचा कंपू साहित्यात तयार झाला असून, त्यांचेच वर्चस्व दिसते. त्यांचे वर्चस्व मोडून मराठीचे स्थान भक्कम करणे गरजेचे आहे.
- मकरंद साठे
--------------
मराठी ज्ञानभाषा कशी होणार, हा खरा प्रश्न आहे. अनुवादाच्या माध्यमातून सध्या चांगले प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता ज्ञानाची निर्मिती आपल्या भाषेत करणे आवश्यक बनले आहे. ज्ञानिर्मितीची प्रक्रिया अखंड, अविरत सुरू राहणे आवश्यक असते. विषय शिकवणे, संधी उपलब्ध करून देणे हे विद्यापीठांचे काम आहे. एखाद्या विषयाला पुरेसे विद्यार्थी नाहीत म्हणून तो बंद करणे योग्य नाही. एखाद्या ज्ञानशाखेचा ऱ्हास होतो आणि आपल्याला काहीच वाटत नाही, ही शोकांतिका आहे. अशाने संस्कृती कशी निर्माण होणार? आधुनिक पाश्चात्य तत्वज्ञान हा आधुनिक पाश्चात्य विज्ञानाला दिलेला प्रतिसाद आहे. तत्वज्ञानाने प्रतिसाद द्यावा असे ज्ञानच आज उपलब्ध नाही.