संविधानाच्या तत्त्वापासून आपण दूर चाललो आहोत; लक्ष्मीकांत देशमुख यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 01:26 PM2018-01-27T13:26:08+5:302018-01-27T13:32:14+5:30
काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीकांत देशमुख यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुणे : आज भारतात कुरूपता वाढत चालली आहे. असहिष्णुता, धार्मिकता याचे बंध अधिक घट्ट होत असल्याने संविधानाच्या तत्त्वापासून आपण दूर चाललो आहोत, अशी खंत ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. लेखक या नात्याने समाजासमोर वास्तवाचा आरसा ठेवला पाहिजे, असेही ते म्हणाले.
काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्या वतीने लक्ष्मीकांत देशमुख यांना ‘काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार’ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. २१ हजार रुपये असे पुरस्कार स्वरूप आहे. याप्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त आर. पी. जोशी उपस्थित होते.
खरा लेखक तो असतो जो दलित आणि शोषितांचा आवाज बनतो. खरा लेखक हा पुरोगामी असतो. प्रतिव्यवस्था सत्ताकेंद्री झाली की ती इतरांचे शोषण करते. याच व्यवस्थेला हादरा दिला पाहिजे. आज विज्ञानवाद, विवेकवाद आणि मानवतावाद या तिन्हींपासून आपण दूर आहोत. आपल्याला प्रश्नच पडत नाहीत. आंधळेपणाने विश्वास ठेवून सर्व गोष्टींचा स्वीकार करीत आहोत, अशा शब्दांत त्यांनी समाजव्यवस्थेवर बोट ठेवले. महिला असुरक्षितता, समान दर्जा यापासून ते शेतकरी आत्महत्या या विषयावर त्यांनी भाष्य केले. सध्या सावित्रीची लेक विरुद्ध जोतिबाचा पुत्र असा संघर्ष सुरू आहे. स्त्रीकडे बुद्धी आणि कर्तव्य आहे, प्रतीक्षा आहे समानतेची. तिला समाजात समान स्थान देणे पुरुषवर्गाला मान्य आहे का? तर हे चित्र नक्कीच आशादायी नाही. पुरोगामी आणि सुसंस्कृततेचा वारसा पुढे नेण्यात जोतिबाचा पुत्र कमी पडला आहे, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.
काकासाहेब गाडगीळ काँग्रेसचे होते खरे कार्यकर्ते
खरा काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे काकासाहेब गाडगीळ होते. साधनशुचिता आणि सामाजिक बांधिलकी ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते, त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, अशी भावना लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.