आमचे मित्रबी नाहीत आणि गावबी राहिला नाही...

By admin | Published: July 28, 2016 03:53 AM2016-07-28T03:53:44+5:302016-07-28T03:53:44+5:30

माळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. नशिबाने वाचलेल्या ग्रामस्थांना जुने गाव, गावातील लोक, सणसमारंभ आठवतात

We are not friendly and do not remain dumb ... | आमचे मित्रबी नाहीत आणि गावबी राहिला नाही...

आमचे मित्रबी नाहीत आणि गावबी राहिला नाही...

Next

- नीलेश काण्णव,  घोडेगाव

माळीण दुर्घटनेला ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती लोकांमध्ये अजूनही ताज्या आहेत. नशिबाने वाचलेल्या ग्रामस्थांना जुने गाव, गावातील लोक, सणसमारंभ आठवतात व या जुन्या आठवणींनी ते गहिवरतात... ग्रामस्थांना हक्काचे घर देण्यासाठी सध्या नवीन गाव वसवण्याचे काम सुरू आहे... घडलेल्या घटनेचा व घटनेनंतर घडलेल्या घडामोंडीचा आढावा ‘लोकमत’ आजपासून घेत आहे.
आमचे मित्रबी नाहीत आणि गावबी राहिला नाही... चोर-पोलीस खेळताना पायाखाली घातलेले गाव आठवते आणि आज त्याच रस्त्याने रोज घरी जाताना सगळा मातीचा ढिगारा दिसतो... मित्रांची घरं दिसत नाहीत.
‘लोकमत’ने माळीण घटनेला ३0 जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत, यानिमित्ताने गावात जाऊन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांना आठवणी सांगताना गहिवरून आले.
झरझरा आला वारा, टपटप पडला पाऊस सारा, ढडम ढडम ढगांचा आवाज, कोकिळा म्हणते पाऊस आला.. पावसा पावसा ये रे.. पीक पाणी खूप रे! अशी गाणी आम्ही भेट दिली असता हे विद्यार्थी गुणगुणत होते. दुर्घटनेतून वाचलेल्या मुलांना अजूनही जुने मित्र, गावातील मारुतीचं मंदिर, मंदिराजवळ खेळत असलेले गावातील सवंगडी आठवतात.
माळीण येथे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा असून, येथे एकूण ७१ मुले शिक्षण घेत आहेत. या शाळेत अडिवरे, पंचाळे, वचपे, आमडे व माळीणमधील मुलं शिक्षण घेत आहेत. या मुलांमध्ये प्रतीक राजेंद्र झांजरे, ऋतीक जालिंदर झांजरे, मनाली गणेश झांजरे, रोनित गणेश झांजरे, रोशन जालिंदर झांजरे, प्रतीक सुनील झांजरे, केतन सुनील झांजरे, अनुष्का दगडू झांजरे ही दुर्घटनेतून बचावलेली आठ मुले शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मागची काही झांजरेंची घरे बचावली व पोटे, लेंभे, विरणक यांची घरे गाडली गेली; त्यामुळे सध्या शाळेत झांजरेंची मुले जास्त आहेत. या मुलांशी बोलताना त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. बालवाडीच्या कुसुमबाई आणि तान्हूबाई खूप आवडायच्या. त्या आम्हाला खाऊ करून द्यायच्या...हे मुलं आजही सांगत आहेत. चिंचेचीवाडीमध्ये राहणाऱ्या दीपाली विजय लेंभे या मुलीला मानसी, पूजा, प्रियंका या मैत्रिणी आठवल्या. त्यांच्या बरोबर जुन्या गावातील मारुती मंदिरासमोर आम्ही खूप खेळायचो. मानसीचं घर खूप आवडायचं आणि आता रोज त्याच रस्त्याने घरी जाताना सगळा मातीचा ढिगाराच दिसतो. आम्ही खेळायचो ते मारुतीचे मंदिर दिसत नाही, आणि माझ्या मैत्रिणीचं घरंबी तिथं नाही.’

- गावातील यात्रा व बैलपोळ्याच्या आठवणी मुलांनी सांगितल्या. ‘यात्रेत आम्ही खूप मजा करायचो, फुगे,गाड्या, खेळणी घ्यायचो. दिवसभर यात्रेत फिरायचो. लय मजा यायची. ‘बैलपोळ्याला बैल सजवायचो, मंदिरासमोर मिरवणूक काढायचो. खूप नाचायचो...

- अविनाश सखाराम लेंभे या मुलाचे मयूर संजय पोटे आणि संतोष दिलीप लेंभे हे मित्र
होते. यांच्या खप्ूा साऱ्या आठवणी त्याने सांगितल्या. ‘गावातील आख्खी पोरं
चोर-पोलीस खेळायचो.

- तेव्हा पूर्ण गावातून आम्ही फिरायचो, लय मजा यायची. खेळून झाल्यावर मग संतोषच्या घरी जाऊन जेवण करायचो...
हे सांगत असतानाच अविनाश गप्प होऊन गहिवरला.

मुले गप्प झाली : प्रतीक सुनील झांजरे, रोशन जालिंदर झांजरे या मुलांची घरे शाळेच्या मागे असल्यामुळे वाचली. पण, त्यांना आजही जुन्या गावातील चिंचेच्या झाडाखाली मुलं खेळताना आठवतात. ते म्हणाले, ‘सोहम झांजरे, सागर पोटे या मित्रांबरोबर मंदिरासमोर बॅटबॉल खेळायचो. कबड्डी, लपाछपी खेळायचो पण आता आम्ही तेथे खेळायला जात नाही. कारण, आमचे मित्र बी नाहीत आणी गाव बी राहिला नाही, असे सांगत ही मुले गप्प झाली.

Web Title: We are not friendly and do not remain dumb ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.