पिंजऱ्यातील ‘वाघा’शी आम्ही दोस्ती करत नाही : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:05+5:302021-06-11T04:08:05+5:30
पुणे : “आम्ही वाघाशी दोस्ती करायला तयार आहोत, पण ती जंगलातील वाघाशी. वाघ जोपर्यंत जंगलात होता तोपर्यंत आमची दोस्ती ...
पुणे : “आम्ही वाघाशी दोस्ती करायला तयार आहोत, पण ती जंगलातील वाघाशी. वाघ जोपर्यंत जंगलात होता तोपर्यंत आमची दोस्ती होती, आता वाघ पिंजऱ्यात अडकला आहे आणि आम्ही पिंजऱ्यातील वाघाशी दोस्ती करत नाही,” अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.
महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातील वयोवृद्ध, दिव्यांग आणि अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आयोजित केली आहे. याचे उद्घाटन पाटील यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पाटील यांनी नुकतेच, ‘नरेंद्र मोदींनी सांगितले तर आम्ही वाघाशी दोस्ती करू’ असे वक्तव्य केले होते. त्यावर संजय राऊत यांनी, ‘वाघाशी मैत्री होत नाही तर वाघ ठरवतो कुणाशी दोस्ती करायची,’ असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देऊन पाटील यांनी शिवसेनेला डिवचले. “आज वाढदिवस आहे, त्यामुळे कटू बोलायला नको,” असे सांगून पाटील म्हणाले की, “त्यांच्या दृष्टीने मी गोड असतो तर शिवसेनेच्या मुखपत्रात आठवड्यातले दोन दिवस माझ्यावर अग्रलेख लिहिले नसते.
भारतीय जनता पक्ष राज्यातील क्रमांक एकचा पक्ष आहे. तिन्हीही पक्ष एकत्र आले, तरी ते भाजप समोर टिकू शकत नाही, हे आम्ही पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिले आहे. आता स्वतःच्या ताकदीवरच महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका जिंकायचा संकल्पही त्यांनी या वेळी जाहीर केला. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनीही वेगवेगळ्या निवडणुका लढवून दाखवाव्यात,” असेही आव्हान त्यांनी केले.
शरद पवार यांनी शिवसेना हा विश्वासू पक्ष असल्याच्या वक्तव्यावर बोलताना पाटील यांनी, ‘मजबुरी का नाम...’ असे म्हणत अधिक भाष्य करणे टाळले. तर उत्तरेकडील राज्यांवर बोलणाऱ्या अजित पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, “अजित पवारांना संजय राऊत यांचा वाण नाही पण गुण लागला आहे.”
चौकट
‘गुप्त’ गिरीश बापट
“मुंबई महापालिकेत २० वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. राज्यातही ते गेली दीड वर्षे सत्तेत आहेत. तरीही त्यांच्याकडून मुंबईत कामे होत नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये लोक त्यांना जागा दाखवतील,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. खासदार गिरीश बापट यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता ते म्हणाले की, “पुण्यातल्या सर्व बैठकांमध्ये गिरीश बापट उपस्थित असतात. पण आमच्या बैठका ‘गुप्त’ असल्याने तुम्हाला ते दिसत नाहीत. आगामी पुणे महापालिकेची निवडणूक गिरीश बापट यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.