"विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याला आपणच जबाबदार.." अपराधी भावनेतून शिक्षकाचं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 10:58 AM2023-08-10T10:58:07+5:302023-08-10T10:58:28+5:30
विद्यार्थ्यांकडून शौचालय साफ करून घेतल्याने विद्यार्थी शाळा सोडून गेल्याची अपराधीपणाची भावना शिक्षकाच्या मनात होती
किरण शिंदे
पुणे : आपल्या शाळेतील 10 पैकी नऊ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याने याला आपणच कारणीभूत असल्याची अपराधीपणाची भावना मनात दाटल्याने जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचललं. या शिक्षकाने वर्गातच विषारी औषध प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील होले वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला आहे. अरविंद देवकर असं या शिक्षकाचं नाव आहे.
टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी अरविंद देवकर यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये त्यांनी आयुष्य संपवण्यामागील कारणे सविस्तर लिहून ठेवले आहेत..
या चिठ्ठीत त्यांनी लिहिलंय कि, जून महिन्यात सुरुवातीचे तेरा दिवस मी विद्यार्थ्यांना अध्यापन करू शकलो नाही कारण, एक शिक्षकी शाळेत काम करत असताना मी बावरून गेलो होतो. विद्यार्थ्यांकडून लेखन विद्यार्थ्यांशी ओळख, गप्पा, गाणी, गोष्टी मैदान साफसफाई या कामातच वेळ गेला. त्यात विद्यार्थ्यांकडून मी आणि विद्यार्थी शौचालय साफ करून घेणे ही गोष्ट पालकांना खटकली. त्यातच शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर कणकण आल्याने जेवणाच्या सुट्टीमध्ये गोळी घेऊन आराम करत होतो. यादरम्यान एका विद्यार्थ्याला दुखापत झाली. माझ्या या सर्व चुकांमुळे शाळेतील दहा विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थ्यांनी खालच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. त्यानंतर शाळेत एकच पहिलीतील विद्यार्थी राहिला. या घटनेनंतर मी पालक वर्गाची माफी मागून, विनंती करून फक्त एकच संधी द्या अशी विनवणी केली होती. मात्र मला कोणीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अपराधीपणाची भावना माझ्या मनात खोलवर रुजली. विद्यार्थी शाळा सोडून जाण्यास सर्वस्वी मीच जबाबदार असल्याची भावना खोलवर रुजल्याने शिक्षण मंदिरात देहाचा त्याग करण्याचे ठरवले, यास कोणासही जबाबदार धरू नये.
आतापर्यंत 19 वर्ष सेवा झाल्याचेही अरविंद देवकर यांनी चिट्ठीत नमूद केले. यापूर्वीच्या शाळेत चांगले सहकारी शिक्षक लाभल्याने सेवा चांगली झाली. मात्र खोली वस्ती येथील शाळा एक शिक्षकी असल्याने कामाच्या गोंधळात मी सुरुवातीला बावरून गेलो होतो. त्यामुळे मला पाहिजे त्या पद्धतीने पालक वर्गाची मने जिंकता आली नाहीत. असं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं. तीन ऑगस्टला त्यांनी प्राथमिक शाळेच्या वर्गातच विषारी औषध प्राशन केलं. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान आठ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला.