हम रस्ते पे आये है साब, हमे मदत चाहिये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:25+5:302021-03-28T04:10:25+5:30
फॅशन स्ट्रीटमधील व्यापारी वर्गाचे पुणेकरांना आर्थिक मदतीचे आवाहन पुणे - गेल्या दहा पंधरा वर्षांपासून आम्ही फॅशन स्ट्रीटमध्ये व्यवसाय करत ...
फॅशन स्ट्रीटमधील व्यापारी वर्गाचे पुणेकरांना आर्थिक मदतीचे आवाहन
पुणे - गेल्या दहा पंधरा वर्षांपासून आम्ही फॅशन स्ट्रीटमध्ये व्यवसाय करत होतो. यावरच आमच्या गरजा भागवल्या जात होत्या. आगीत पूर्ण दुकानच जळून खाक झाले आहे. आमचा दुसरा कुठलाही व्यवसाय नाही. आता आम्ही रस्त्यावर आलो आहोत. सरकार आणि पुणेकरांकडून मदतीची अपेक्षा आहे, अशी विनंती येथील व्यावसायिकांनी केली आहे.
फॅशन स्ट्रीट येथे लागलेल्या आगीत चारशेपेक्षा जास्त दुकाने जळून खाक झाली आहेत. आगीत दुकानदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. फॅशन स्ट्रीटच्या व्यापारी वर्ग आणि त्या भागातील सामाजिक संघटनांकडून नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आपले दुःख व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले नाहीत. एक मदतीची आर्त हाक त्यांच्या बोलण्यातून दिसून आली. सर्वकाही गमावले पोटापाण्याचा प्रश्न कोण सोडवणार? या भावनेतून त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
पुण्याचे खास आकर्षण असणाऱ्या फॅशन स्ट्रीटमध्ये काल रात्री ११ च्या सुमारास भीषण आग लागली. स्ट्रीटमध्ये सर्वाधिक कपड्यांची दुकाने असल्याने आगीचा भडका उडण्यास वेळ लागला नाही. रात्रीच्या वेळी पूर्ण फॅशन स्ट्रीट बंद झाले होते. सर्व व्यापारी आपली दुकाने बंद करून घरी गेले होते. आग लागल्यानंतर व्यापाऱ्यांना फोन येऊ लागले. त्याचक्षणी त्यांनी फॅशन स्ट्रीटकडे धाव घेतल्याचे सांगितले.
आगीत सर्व काही जळताना पाहून डोळ्यातून अश्रूही फुटत नव्हते. सर्व शरीर स्तब्ध झाले होते. आता जगण्यात अर्थ राहिला नाही. या आगीपुढे आपले काहीच उरणार नाही, असेच आम्हाला वाटू लागले होते. प्रत्यक्षात तेच घडले असून आमच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याची व्यथा त्यांनी यावेळी मांडली.
दहा मिनिटाच्या अंतरावर आहे अग्निशमन दलाचे कार्यालय
फॅशन स्ट्रीटपासून दहा मिनिटांच्या अंतरावर अग्निशमन दलाचे कार्यालय आहे. तरीही आग लागल्यानंतर ते अर्ध्या पाऊण तासाने घटनास्थळी पोहोचले. तसेच फॅशन स्ट्रीटची जागा खूप मोठी असल्याने सुरुवातीपासूनच जास्तीत जास्त गाड्या दाखल होणे गरजेचे होते. पण उशिरा येऊनही एकच गाडी सुरुवातीला आली होती. स्ट्रीटमध्ये चिंचोळ्या गल्ल्यांचे प्रमाण जास्त असल्याने त्या गाड्यांना आतमध्ये जाण्यासही अडचणी निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
व्यापारी रोहन धुपत म्हणाले, दहा वर्षांपासून माझे फॅशन स्ट्रीटमध्ये दुकान आहे. ट्रॅक पँट, बर्मुडा असे कपडे मी विकत होतो. रमझानच्या निमित्ताने ८ लाखांचा माल भरून ठेवला होता. सद्यस्थितीत हातात काहीच उरले नाही. अशा परिस्थितीत काय करावे आम्हाला सूचत नाही. आमच्या वतीने येथील संघटना मदत मागत आहेत. सरकारकडूनही आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
-----------------
माझ्याबरोबर दुकानात आठ कामगार कार्यरत आहेत. या आगीत आमचे संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. आम्ही मागणीनुसार माल भरून ठेवतो. त्यामुळे अतिरिक्त काही भरून ठेवले नाही. माझ्यासहित कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे या फॅशन स्ट्रीटमध्ये असंख्य कामगार आहेत. कोणीतरी मदत करावी, याच आशेवर आम्ही आहोत.
असिफ बंदगी, व्यापारी
---------------------
फॅशन स्ट्रीट १९९७ साली सुरू झाले. तेव्हापासून आमचे येथे दुकान आहे. जुने असल्याने असंख्य ग्राहक ओळखीचे झाले होते. आवडीने दुकानात कपडे घेण्यासाठी येत होते. पण आता आमचे जगणे अवघड झाल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे. जवळपास दहा ते पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई मिळणे सध्यातरी अवघड वाटत आहे. कोरोनामुळे अनेक अडचणींना सामोरे जाऊन व्यवसाय चालू झाला होता. आता पुन्हा व्यवसाय उभे करणे आमच्यासाठी आव्हानच असणार आहे.
-शहानू शेख, व्यापारी