“आम्ही उदयनराजेंच्या पाठिशी आहोत, छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 10:47 PM2022-11-28T22:47:54+5:302022-11-28T22:48:58+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. राज्यपालांवरही केलं भाष्य.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. सोमवारी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आक्रमक भूमिका घेतली. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठिशी आम्ही कायम असल्याचं फडणवीस म्हणाले. तर त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी यावर वक्तव्य केलं.
“खासदार उयनराजे भोसले यांच्या पाठिशी भाजप कायम आहे. छत्रपतींचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. तरी त्या ठिकाणी ते भावनेने बोलले असले तरी महाराष्ट्र आणि देश त्यांच्या पाठिशी आहेत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचवल्या आहेत. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना नियुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना असतात. त्यांच्या भावनेच्या पाठिशी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे कोणी प्रेरणास्त्रोत कोणी असूच शकत नाहीत,” असं फडणवीस यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते उदयनराजे भोसले?
"आज राज्यातील शिवप्रेमींशी चर्चा केली, सर्वांनी मुद्दे मांडले. महाराजांचे चित्रपटातून अवहेलना केली जाते, तेव्हा राग कसा येत नाही? तुम्ही महाराजांचे राजकारणासाठी नाव का घेता, असा सवाल खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला. लोकशाहीचा ढाचा महाराजांनी मांडला. जे महाराजांवर चुकीच बोलतात त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा का होत नाही, असंही खासदार भोसले म्हणाले.
"महाराजांनी सर्वांना एकत्र आणले होते, सगळ्या जातींना एकत्र राहण्यास शिकवले होते. महाराजांबद्दल सध्या होत असलेल्या राजकारणामुळे लोक चिडले आहेत. त्यामुळे ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता रायगडावर जाऊन प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार" असल्याचे खासदार उदयनराजे भासले म्हणाले. "राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची मी या संदर्भात भेट घेणार आहे. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. त्यांनी कारवाई केली नाही तरीही मी माझी भूमिका बदलणार नाही, असंही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.