हम दोनो एकदम जुडवाँ.....पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘सवाई’त उलगडले शिवहरीचे मैत्रीपर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:43 PM2017-12-14T17:43:20+5:302017-12-14T17:48:59+5:30
ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पं. शिवकुमार शर्मा यांच्याशी ‘शिवहरी’च्या माध्यमातून जुळलेल्या मैत्रीबंधाचे अद्वितीय स्वरपर्व ‘सवाई’त उलगडले.
पुणे : आम्हाला स्वत: लाच कळत नाही ही कशाप्रकारची मैत्री आहे.. मात्र अशी मैत्री कधी पाहिली नाही ना कधी ऐकली...१९५४ पासून सुरू झालेली ही मैत्री कधी संपेल माहीत नाही.. जेव्हा कधी भेटतो तेव्हा भांडणालाच सुरूवात होते.. लगता है हम दोनो एकही पेटसे बाहर आए है, एकदम 'जुडवाँ'....अशा शब्दातं ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पं. शिवकुमार शर्मा यांच्याशी ‘शिवहरी’च्या माध्यमातून जुळलेल्या मैत्रीबंधाचे अद्वितीय स्वरपर्व उलगडले. पण...आता संगीत देणे बंद केले आहे. अनारकली, मुघले आझम चा काळ संपला. आता तसे विषय बनत नाहीत. त्यामुळे विश्रांती घेतली आहे..लोकांना जे करायच ते करून देत. चांगले विषय मिळाले तर परत सुरूवात करू, असे चौरसिया यांनी सांगितले.
आमच्या मैत्रीचा प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असाच आहे. ज्यावेळी मुंबईमध्ये आलो तेव्हा चित्रपटाशी आमचा दूरान्वये संबंध नव्हता. शास्त्रीय संगीताचा रियाज करणे आणि गुरू अन्नपूर्णा यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेणे इतकेच आम्ही करीत होतो. चित्रपटांचा विचार केला तर आम्हाला धक्के मारून बाहेर काढले जात होते..पण नंतर आमचे संगीत लोकांना आवडायला लागले. आम्ही ज्या पद्धतीने संगीताचा विचार करायचो उदा: ये कहा आ गये हम’ हे गाणे ऐकल्यानंतर यांना संगीत का करायला देऊ नये.जर्मन, फ्रेंच या व्यक्ती देखील माणसेच असतात, संगीत पण तसेच आहे. शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त जे आधुनिक, व्यावसायिक आणि बॉलिवूड संगीत आहे ते लोकांच्या आत्म्यामध्ये आहे. नेहमी लोक ही गाणी गुणगुणत असतात. मग का नाही त्यांच्या हदयापर्यंत पोहोचून त्यांचा आशिर्वाद घेऊ, भगवानची कृपा झाली. नशीबानेही साथ दिली आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासमवेत काम केले. एक छान ट्यूनिंग आमच्यात जुळले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.शिवहरी यांचे संगीत पुन्हा ऐकायला मिळणार का? तर पंडितजींनी तत्काळ होकार दिला. थोडासा ब्रेक झाला आहे, झटपट पैसे मिळावे अशी लालच अनेकांना असते. आम्हाला पण आहे. पण काम करीत आहोत नव्या पिढीला काय देत आहोत, काय संदेश देत आहोत हे महत्वाचे आहे. आत्ताच्या चित्रपटात पिढीला साधे डायलॉग व्यवस्थित म्हणता येत नाहीत. इंग्रजीचा वापर वाढला आहे. फक्त त्यांना पैसे मिळवायचे आहेत्, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
संगीतात रिमिक्सचे ‘प्रदूषण’
रिमिक्सच्या जमान्यात झटपट प्रसिध्दीच्या मागे तरूण पिढी लागली आहे, एक काळ होता की संगीतासाठी साधना केली जायची मात्र आज ती साधनाच हरवली आहे, या प्रश्नाला पंडितजींनी दुजोरा दिला. आपण खूप आधुनिक आहोत, असे दाखविले जात आहे. संगीतात जशी घाणेरडी हवा आल्याने वातावरण प्रदूषित होते तसे आज काहीसे झाले आहे. मुलांचा मेंदू आणि विचार करण्याची क्षमता लुप्त तर होणार नाही ना? अशी भीती वाटते. मुलांना एकदा सांगितले की लक्षात यायचे पण आता त्यांच्या मेंदूत काहीच शिरत नाही. धरती, आकाश, चंद्रमा, पहाडी यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला काही महत्त्व नाही.