देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये डांबण्याचा ‘सिलसिला’ थांबणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 07:47 PM2019-10-17T19:47:18+5:302019-10-17T19:58:26+5:30
मोठी स्वप्ने आम्ही पाहतो. मोठे लक्ष्य आम्ही बघतो कारण आम्ही इमानदार आहोत. इमानदारीने कमावणारा सामान्य करादाता आणि आमच्या मध्यमवर्गाबरोबर सरकार ठामपणे उभे आहे.
पुणे : ‘‘गेल्या पाच वर्षात देशाला लुटणाऱ्यांना तुरुंगाच्या दरवाजापर्यंत घेऊन आलो आहे. आता त्यांना...’’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पॉज’ घेतला. त्यानंतर कोणाचेही नाव न घेता मोदी म्हणाले, ‘‘गरीबांच्या, मध्यमवर्गीयांच्या मेहनतीची पै-पै वसुल होत नाही तोवर तुमचा सेवक शांत बसणार नाही.’’ नवे सरकार आल्यानंतर देशाला लुटणाऱ्यांना डांबण्यास सुरवात झाली आहे की नाही, असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर श्रोत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद येताच, ‘‘हा सिलसिला येथे थांबणारा नाही. तुम्ही निश्चिंत रहा,’’ या शब्दात त्यांनी आश्वस्त केले.
पुणे जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांनी गुरुवारी (दि. १७) पुण्यातल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, खासदार गिरीश बापट, भाजपाच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ आदी यावेळी उपस्थित होते.
‘‘मोठी स्वप्ने आम्ही पाहतो. मोठे लक्ष्य आम्ही बघतो कारण आम्ही इमानदार आहोत. इमानदारीने कमावणारा सामान्य करादाता आणि आमच्या मध्यमवर्गाबरोबर सरकार ठामपणे उभे आहे. देशाची अर्थव्यवस्था चालवण्यात मध्यमवर्गाचे योगदान मोठे आहे. त्यासाठीच व्यवस्थेतील अपप्रवृती काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत,’’ असे मोदी म्हणाले.