जरांगेंशी आपली भेट किंवा बोलणेही नाही, जबाबदार व्यक्तींनी केलेले पोरकट आरोप- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 10:57 AM2024-02-28T10:57:45+5:302024-02-28T10:58:52+5:30
मार्केट यार्ड येथील एका कार्यालयात शरद पवार यांनी मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची दिवसभर बैठक घेतली...
पुणे : यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेकांना मी पाहिले आहे, मात्र जबाबदार पदावरील व्यक्तीने असे पोरकट आरोप केलेले मी याआधी कधीही पाहिलेले नाही, अशा शब्दांमध्ये ‘जरांगे शरद पवार यांची स्क्रिप्ट बोलतात’ या आरोपाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. हे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मार्केट यार्ड येथील एका कार्यालयात शरद पवार यांनी मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची दिवसभर बैठक घेतली. खासदार सुप्रिया सुळे याही त्यांच्यासमवेत होत्या. बैठका संपल्यानंतर सायंकाळी पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, “जरांगे यांनी अगदी सुरुवातीला उपोषण केले, त्यावेळी त्यांची भेट घेणारा मी पहिलाच होते. त्याही वेळी मी त्यांना राज्याच्या सामाजिक ऐक्याला धक्का लागेल असे काही करू नका, हेच सांगितले होते. त्यानंतर त्यांची व माझी आजतागायत भेटही नाही व बोलणेही नाही.”
देशातील लोकांना पर्याय हवा आहे हे स्पष्ट दिसते आहे. अशा वेळी राजकीय पक्ष म्हणून आमची पर्याय देण्याची नैतिक जबाबदारी आहे, असे मला वाटते. तसे होताना दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांची आज सभा होती, त्यांची अडचण जेन्यूईन होती, त्यामुळे ते नव्हते, मात्र इंडिया फ्रंटचे जागावाटप व्यवस्थित होईल, असे पवार यांनी सांगितले. केजरीवाल यांना त्रास दिला जातो, हे सगळा देश पाहतो आहे, आमचा त्यांना पाठिंबा आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, सर्वोच्च न्यायालय त्यांच्या संदर्भात योग्य तो निर्णय देईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातून अनेक कार्यकर्ते आज आले होते. त्यांना त्रास दिल्याच्या, नोकरी घालवण्याच्या तक्रारी दिल्या जात आहेत, असे काहीही झालेले आढळले तर माझ्याकडे येऊन सांगा, असे मी त्यांना सांगितले. सुनेत्रा पवार बारामतीमधून उभ्या राहत असतील तर लोकशाहीत कोणालाही कुठूनही उभे राहण्याचा अधिकार आहे, इतकेच उत्तर देत पवार यांनी कौटुंबिक प्रश्न विचारू नका असे सांगितले.
कधी अडकून पडलो सांगा
तुम्हाला बारामतीत अडकून ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे का? यावर पवार यांनी मिस्कीलपणे सांगितले की, आतापर्यंत मी १४ निवडणुका लढवल्या, त्यातील ७ लोकसभेच्या होत्या. कधी अडकून पडलो तुम्हीच सांगा. मग आता काय अडकून पडणार? सरकारने मराठा आरक्षण दिले आहे, ते न्यायालयात टिकले तर आनंदच आहे, मात्र न्यायालयाच्या निर्णयाचा आतापर्यंतचा इतिहास तसा नाही, असे पवार म्हणाले.