आम्ही जबाबदारी झटकत नाही; पण तुम्ही आमचे कान आणि डोळे बना ! पोलीस आयुक्तांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 02:38 PM2024-08-30T14:38:11+5:302024-08-30T14:38:22+5:30
पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, प्रामुख्याने महिला विषयक अत्याचारांसंदर्भात आम्ही आमचे कार्य चोखपणे बजावत आहाेत
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात सध्या तब्बल ११ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शहराची लाेकसंख्या सत्तर लाखांपेक्षा अधिक आहे. या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी केवळ साडेनऊ हजार पोलीस कार्यरत आहेत. अनेकांना असे वाटते की, आमच्याकडे जादूची कांडी आहे. ती फिरवली की पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचतात, मात्र असे नाही. याचा अर्थ आम्ही आमची जबाबदारी झटकताे असे नाही, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, प्रामुख्याने महिला विषयक अत्याचारांसंदर्भात आम्ही आमचे कार्य चोखपणे बजावत आहाेत. बलात्कार, खून, दराेडा, दंगल आदी घटना घडल्यानंतर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न हाेताेच; पण अशा घटना घडूच नयेत, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. नागरिकांनी जागरूक राहून आमचे कान आणि डोळे बनावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
पुणे पोलीस दलाच्या वतीने शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि महिलांची सुरक्षितता या विषयावर स्वारगेट येथील गणेश कला, क्रीडा मंच येथे आयोजित ‘शाळा सुरक्षा परिषदे’त पाेलीस आयुक्त बाेलत हाेते. यात शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पाेलीस आयुक्त म्हणाले की, तुमच्या आजूबाजूला अपप्रवृत्ती दिसत असेल, समाजकंटक किंवा वाईट घटना घडत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की, ‘येथे रावण राज नाही, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही.’
बदलापूर येथे शाळेत चार वर्षीय मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर, पुणे पोलीस देखील ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलीस आयुक्तांनी शाळांमध्ये जनजागृतीबरोबरच शाळा प्रशासनाला अनेक मुद्यांवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा शाळेत जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच शाळेतून घरी जाईपर्यंत दक्षता बाळगली पाहिजे. शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात येत असतात. या उपाययोजनांशी तडजोड केली जाणार नाही, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
शाळा परिसरात हवेत हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे
शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. संपूर्ण शाळा व परिसर कॅमेऱ्यांच्या निगराणीत राहील, अशा ठिकाणी ते बसवावेत. कॅमेऱ्यातील रेकॉर्डिंग कमीत कमी पंधरा दिवस संग्रहित राहील याची दक्षता घ्यावी. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ठराविक अंतराने तपासणे आवश्यक असून, अशा फुटेजमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर योग्य कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकांची आणि सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल.
शिक्षकेतर कर्मचारी नेमताय, ही खबरदारी घ्याच!
नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्य स्त्रोतांद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने केल्या जाणाऱ्या नेमणुकांबाबत शाळा व्यवस्थापनामार्फत काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहणार आहे. यासाठी ऑनलाइन चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज देखील पुणे पोलिसांना केला जाऊ शकतो.
तुम्ही तक्रार करा, पुढे आम्ही बघू
शाळा परिसराच्या शंभर यार्ड अंतरावर कोणत्याही प्रकारची तंबाखू, गुटखा विक्री करणाऱ्या टपऱ्या असता कामा नये. यासाठी तुम्ही स्वतः शाळेपासूनचे अंतर सुनिश्चित करुन घ्या. शाळेने सांगूनही संबंधित विक्रेता ऐकत नसेल तर आम्हाला सांगा. आमच्याकडे तक्रार आली की, तुमचे काम संपले. आम्ही महापालिकेला हाताशी घेत अशा विक्रेत्यांचा समूळ नाश करू. महिला व मुलींची सुरक्षितता ही पुणे पोलिसांचे प्राधान्य आहे, असेही पाेलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.
कायदा काय सांगताे?
गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे पोक्सो कायद्यांतर्गत तरतुदी, महिला व मुलींविषयी तत्कालीन भारतीय दंड विधान आणि नवीन भारतीय न्याय संहितेतील तुलनात्मक तक्ता, महिलांसंबंधीचे अपराध आणि त्याला असणारी शिक्षा, महिलांसंबधी लैंगिक अपराध व त्याला असणारी शिक्षा, महिला, मुली व बालकांच्या सुरक्षिततेसाठी राबवण्यात येणारे उपक्रम (भरोसा सेल, विशेष बाल पथक, दामिनी पथक, बडी कॉप, पोलीस काका, पोलीस दीदी) याबाबत माहिती दिली.
महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यरत हेल्पलाईन नंबर
१) महिलांच्या सुरक्षेसाठी - १०९१
२) आपत्कालीन पोलीस हेल्पलाईन नंबर - ११२
३) नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) - (व्हॉट्सॲप नंबर) - ८९७५९५३१००