आम्हाला राजकारणात यायचं नाही; तिकडं लय पैसा लागतो - मनोज जारांगे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 11:25 AM2024-01-24T11:25:45+5:302024-01-24T11:26:10+5:30
राजकारणात नाही यायचं, आम्ही सामांन्यांसाठी लढत आहोत, आम्हाला फक्त आरक्षण द्या
पुणे: लाखो मराठा बांधव मनोज जरांगे पाटलांसोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जरांगे पाटलांचा काल पुण्यात प्रवेश झाला. तोच उत्साह, जल्लोष पाटलांवर ती फुलांची उधळण अशा वातावरणात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. आज ते शहराच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मनोज जरांगे यांचा मोर्चा पुणे शहरातील उपनगरातून मोठ्या संख्येने पुढे जात आहे. चौकाचौकात त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. मोर्चामध्ये पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तुम्ही राजकारण येणार आहात का? असा प्रश्न विचारला असता. त्यांनी तिकडं लय पैसा लागतो असं सूचक वक्तव्य केलं आहे.
पाटील म्हणाले, आम्ही सामान्य माणूस आहोत. आम्हाला राजकारणात यायचं नाही. तिकडं लय पैसा लागतो. ते आपलं काम नाही. आम्ही सामांन्यांसाठी लढत आहोत. आम्हाला फक्त आरक्षण द्या. मुंबईत जमावबंदी आहे तरी तुम्ही एवढा मोर्चा घेऊन तिकडं चालला आहात? असे विचारले असता जारांगे पाटील म्हणाले, आमच्यासाठी जमावबंदी आहे असं काही नाही. मुंबईच्या वाहनांना प्रवेश नाही असंही काही नाही. ते मोठं शहर आहे. विविध कारणास्तव तिकडं जमावबंदी लागू केली जाते. आम्हाला मुंबईला जायची हौस नाहीये. शासनाने सांगितलं कि, ५४ लाख नोंदी मिळाल्या आहेत. त्या वाटप केले पाहिजेत
सध्या संपूर्ण समाज रस्त्यात उभा आहे. आमची नवीन काही मागणी नाही. इतका मोठा समुदाय येतोय. त्यांनी दिलेल्या शब्दावर आम्ही येतोय पण तेच काम करत नाहीयेत. ७ महिने सरकाराला वेळ दिला आहे. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्या वितरित का केल्या नाहीत. कायदा बनवणारे आले होते त्यांचा शब्द होता तो पाळला नाही. कायदेशीर बाजू मांडत नाही हेच चुकीचं आहे. तर मग ओबीसी बांधवाना नोंदी मागितल्या नाहीत. आम्हाला मात्र नोंदी मागत आहेत. आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावं.
आम्ही कोणालाही वेठीस धरले नाही
रोजच जगणं सुरळीत व्हावं यासाठीच आम्ही आरक्षण मागतोय. तुमच्या दारातून आम्ही १ दिवसापुरते आलोय. आम्ही तुमच्या दारातून एकदा चाललोय. तुम्ही फक्त १ तांब्या पाणी द्या. आम्ही कोणालाही वेठीस धरले नाही. तुमच्या मोठ्या शहरातून एक रस्ता आम्हाला द्या.