आम्हाला विमानतळ प्रकल्पाला जमीन द्यायचीच नाही; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा एल्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:12 IST2025-04-06T18:11:41+5:302025-04-06T18:12:13+5:30

- प्रांताधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ : उपोषणादरम्यान पारगावचे सरपंच ज्योती मेमाणे अत्यवस्थ, ग्रामीण रुग्णालयात दाखल

We don't want to give land to the airport project; Farmers' protest on third day of hunger strike | आम्हाला विमानतळ प्रकल्पाला जमीन द्यायचीच नाही; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा एल्गार 

आम्हाला विमानतळ प्रकल्पाला जमीन द्यायचीच नाही; उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा एल्गार 

सासवड : आम्ही उपोषण करतोय हा आमचा गुन्हा आहे का? सरकार आमची दखल घेत नाही, फक्त पुणे, मुंबईतून विमानतळाच्या घोषणा होत आहेत. हे असले राजकीय विचाराचे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे विमानतळ आम्हाला नको आहे. तुमचे पैसे आम्हास नकोत, आम्हाला आमची जमीन प्यारी आहे. ज्यांना विमानतळ प्रकल्प करायचा आहे त्यांनी स्वतःच्या जागेत करावा, नाही तर आम्हाला तुमची जागा द्या आणि नंतर विमानतळ करा, तोपर्यंत आमच्या जमिनीत कोणालाही आम्ही पाय ठेवून देणार नाही. असा एल्गार करीत विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आपला विरोध जाहीर केला. जोपर्यंत विमानतळ रद्द केल्याची अधिसूचना निघत नाही. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार, असा निर्धार केला. त्यामुळे प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

विमानतळ आम्हाला नकोच, अशी घोषणा सात गावातील शेतकऱ्यांनी सासवडमधील प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोणत्याही परिस्थतीत आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. उपोषण सुरू असताना शुक्रवारी तहसीलदार विक्रम राजपूत यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आमच्या भावना जोपर्यंत शासनापर्यंत पोहोचत नाहीत. तसेच शासन आमची दखल घेणार नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर रविवारी (दि. ६) पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

मात्र, उपस्थित सर्वच शेतकरी आक्रमक होऊन आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जमीन द्यायची नाही, ज्यांना विमानतळ प्रकल्प करायचा आहे, त्यांनी स्वतःच्या जागेत करावा, नाही तर आम्हाला तुमची जागा द्या आणि नंतर विमानतळ करा, तोपर्यंत आमच्या जमिनीत कोणालाही पाय ठेवून देणार नाही, अशा प्रकारचा एल्गार करीत विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी आपला विरोध जाहीर केला. प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी शेतकऱ्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या, तसेच तुमच्या मागण्या लेखी स्वरूपात द्याव्यात, त्या जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने पाठविण्यात येतील, असे सांगितले. त्यानंतर उपस्थित सर्व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आपल्या हरकती आणि मागण्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्याकडे लेखी स्वरूपात सुपुर्द केल्या.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, पारगाव, खानवडी आदी सात गावांत विमानतळ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी २८३२ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. विमानतळ प्रकल्प क्षेत्रातील गावे औद्योगिक क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर केली, तसेच भूसंपादनाचा पुढील टप्पा गाठण्याच्या दृष्टीने गावोगावी अधिकारी शेतकऱ्यांशी संवादाच्या माध्यमातून ड्रोन सर्व्हे करण्याच्या प्रयत्नात आहे, तसेच ३२ ‘ग’चा आदेश निघाल्यानंतर सातबारावरती शिक्के मारण्याची प्रक्रिया होणार आहे.
 

विमानतळ प्रकल्पबाधितांच्या मागण्या -

- विमानतळ प्रकल्पबाधित गावांचा करण्यात येणारा ड्रोन सर्व्हे तातडीने थांबवावा.

- विमानतळ प्रकल्पामुळे गावातील सर्व फळबागा नष्ट होणार असून, त्यावरील जीवन उद्ध्वस्त होईल.

- प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन आणि बेघर होतील. यासह विविध मागण्या दिल्या आहेत.
 

Web Title: We don't want to give land to the airport project; Farmers' protest on third day of hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.