आम्हाला व्हॅक्सिन नको, आसाराम बापूंना सोडा; फलक दर्शविणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 09:08 PM2020-11-28T21:08:32+5:302020-11-28T21:08:57+5:30
आसाराम बापू हे गेली ७ वर्षे जोधपूर तुरुंगात आहेत. मानवतेच्या मुदद्यावर त्यांची मुक्तता करावी अशी होती मागणी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिरम इन्स्टिट्युट भेटीच्या वेळी युवा सेवा संघाच्या तिघा कार्यकत्यांनी फलक दर्शवत आसाराम बापू यांना सोडण्याची मागणी केली. पोलिसांनी त्या तिघांना तातडीने ताब्यात घेतले.
ऋषिकेश सुहास देवरे, संतोष हिरालाल शेजव आणि संतोष देवरे अशी त्यांची नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाच्यावेळी हे तिघे सिरम इन्स्टिट्यूटच्या समोरील बाजूला हातात फलक घेऊन उभे राहिले. हे पाहताच तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील फलक काढून घेतला. त्यांच्याकडे काही पत्रकेही होती. आसाराम बापू हे गेली ७ वर्षे जोधपूर तुरुंगात आहेत. मानवतेच्या मुदद्यावर त्यांची मुक्तता करावी, अशी त्यांची मागणी होती.
पंतप्रधान रस्ता मार्गे विमानतळाला रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर सायंकाळी विमानतळावर जाण्यासाठी रस्ते मार्गाचा वापर केला. नियोजनाप्रमाणे लोहगाव विमानतळावरुन सिरमला जाऊन येण्यासाठी ते हेलिकॉप्टरचा वापर करणार होते. मात्र सूर्यास्त झाल्यानंतर अंधार पडल्याने विमानतळ गाठण्यासाठी मोदींनी हेलिकॉप्टरऐवजी चारचाकी वाहनाचा वापर केला.
पंतप्रधान मोदी हे सायंकाळी पावणेपाच वाजता वायुसेनेच्या विशेष विमानाने पुण्यात दाखल झाले. तेथून हेलिकॉप्टरने मांजरी येथील हेलिपॅडवर त्यांचे आगमन झाले. सुमारे तासभर ते या ठिकाणी होते. त्यानंतर पंतप्रधानांचा ताफा रस्त्याने विमानतळाकडे रवाना झाला.
यावेळी शहर पोलीस दलाने या पर्यायी मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला होता. लोहगाव विमानतळवरील टेक्निकल एअरपोर्ट तसेच मांजरी येथील हेलिपॅड येथे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच तेथून सिरम इन्स्टीट्युटच्या मार्गावर सर्वत्र अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या निगराणीखाली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.