तुमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा जीव घेणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 07:22 PM2021-06-18T19:22:27+5:302021-06-18T19:27:56+5:30
रिंग रोड व पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला बाधित शेतकऱ्यांचा कडाडून विरोध
आळंदी: आळंदीसहीत आजूबाजूच्या गावांमध्ये रिंग रोड व पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे संदर्भात दोन दिवसांपासून प्रशासकीय बैठका सुरू आहेत. मात्र बहुतांशी सर्वच बैठकांमध्ये दोन्ही प्रस्तावित प्रकल्पांना बाधित शेतकऱ्यांकडून कडाडून विरोधाचा सूर उमटत आहे. आळंदीत प्रस्तावित असलेल्या रिंग रोड प्रकल्पाला स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी काळ्या फीती लावून रिंग रोडच्या आखणीस व मोजणीस विरोध दर्शविला आहे. तर गोलेगाव - पिंपळगाव, मरकळ, चऱ्होली खुर्द गावातील बाधित शेतकऱ्यांनी रेल्वे प्रकल्प आमच्या जमिनीतून आम्ही होऊ देणार नाही. तुम्ही तुमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा जीव घेणार का? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
आळंदीत गुरुवारी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण व संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रिंग रोड बाधितांची संवाद बैठक पार पडली. मात्र या बैठकीत उपस्थित सर्वच शेतकऱ्यांनी या प्रस्तावित रिंग रोडला विरोध करत पर्यायी मार्ग अवलंब करण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे वरिष्ठांना काळवण्याची ग्वाही दिल्यानंतर बाधित शेतकरी शांत झाले.
दरम्यान रिंग रोड प्रकल्पाने अनेकजण भूमिहीन होणार आहेत. शेती, घरे उध्वस्त होणार असल्याने अनेकांना जीवन जगणेही मुश्किल होणार आहे. त्यामुळे आमचे जीवन उध्वस्त करून कोणाचे ड्रीम प्रोजेक्ट उभे राहणार नाहीत. विकासाला विरोध नाही. मात्र रिंग रोड व पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे आमच्या जमिनी शिल्लक राहणार नाहीत. अशा या ड्रीम प्रोजेक्टला नेहमी आमचा विरोधच राहणार आहे. प्रस्तावित रिंग रोडची आखणी बदलून ती शासकीय गायरान व वन विभागाच्या जमिनीतून विकसित करण्याची मागणी संवाद बैठकीत करण्यात आली.