शंभर वर्षे शिकत आलो, कुणाला शिकवायला कधी गेलो नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:12 AM2021-07-29T04:12:32+5:302021-07-29T04:12:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘शंभरावं वर्ष लागतंय...कदाचित विधात्यानंच हे लिहून ठेवलं असेल. ती त्याची इच्छा असावी. या शंभर ...

We have been learning for a hundred years, we have never gone to teach anyone | शंभर वर्षे शिकत आलो, कुणाला शिकवायला कधी गेलो नाही

शंभर वर्षे शिकत आलो, कुणाला शिकवायला कधी गेलो नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘शंभरावं वर्ष लागतंय...कदाचित विधात्यानंच हे लिहून ठेवलं असेल. ती त्याची इच्छा असावी. या शंभर वर्षांच्या काळात मी खूप शिकलो. शिकविण्याचा आव मी कधी आणला नाही’, शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते.

शंभरावं वर्ष लागतंय. पण मी खरंतर वेगळं असं काही केलं नाही. मला कसलंही व्यसन नाही इतकंच. आणखी किती वर्षे जगणार माहिती नाही. पण जर अजून दोन ते तीन वर्षे मिळाली तर इतकंच मागतो की मला आजारी पडू देऊ नकोस. पुढील आयुष्य मिळालं तर छान हसत, खेळतं स्वावलंबी जीवन मिळावं....अशी भावना पुरंदरे यांनी व्यक्त केली.

कोथरूड येथे मुलाच्या घरी बाबासाहेब वास्तव्यास आहेत. वयाची ८० वर्षे शिवचरित्राचा ध्यास घेत तब्बल ५ लाख किलोमीटरचा प्रवास, राजा शिवछत्रपती ग्रंथाच्या १७ आवृत्या, जगभरात २५ हजार व्याख्याने असा थक्क करणारा प्रवास करीत हे शिवशाहीर गुरूवारी (दि. २९) वयाची ९९ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी संवाद साधला. स्पाँडिलायसिसचा त्रास जाणवू लागल्यामुळे ते झोपूनच होते. कुणालाही निराश न करता प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करीत उत्साहाने सर्वांना सामोरे जाणारे बाबासाहेब आज काहीसे हळवे झाले होते... मला अधिक बोलता येत नाहीये त्याबद्दल माफ करा... हे सांगताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले... १९४० साली सायकलवरून पडल्यानंतर स्पाँडिलायसिसचा त्रास सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

आयुष्यात मिळालेले आई-वडील आणि शिक्षकांचे संस्कार कधीही विसरणार नाही. वडिलांचं नेहमी सांगण होतं की ‘बाबासाहेब माणसानं नेहमी समजून वागावं’. ती समजूत आपलीच आपल्याला घ्यायची आहे. ती कुणी आयती आणून देणार नाही. ‘जे शिकवतात ते गुरू’. ते जे शिकवतात ते मनापासून शिकलं पाहिजे. आईवडिलांबददल आदरभावना ठेवली पाहिजे. जे आपल्यासाठी इतकं करतात त्यांना वृद्धाश्रमात ठेवतो. आईवडिलांशी फक्त गोड बोला ते तुम्हाला उदंड आशीर्वाद देतील. कोणाचाही अपमान, द्वेष करू नका असं वडिलांनी शिकवलं... त्यांनी दिलेली शिकवण कधीही विसरलो नसल्याचे ते म्हणाले.

----------------------------------------------------------------------------------------------------------

‘वयाच्या ९९ वर्षांमध्ये मी आनंदी आहे. पण समाधानी आणि तृप्त नाही. प्रकृतीने साथ दिली तर खूप काही लिहायची इच्छा आहे. सर्वांना रायगडावर घेऊन जायचे आहे. - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: We have been learning for a hundred years, we have never gone to teach anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.