Vidhan Sabha 2019 : ''आमचं पण ठरलंय'' ; कसब्यात झळकले फ्लेक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 15:11 IST2019-09-30T15:10:00+5:302019-09-30T15:11:03+5:30
आमचं ठरलंय बाहेरचा उमेदवार नकाे असे फ्लेक्स कसबा मतदारसंघामध्ये लावण्यात आले आहेत.

Vidhan Sabha 2019 : ''आमचं पण ठरलंय'' ; कसब्यात झळकले फ्लेक्स
पुणे : विधानसभेची निवडणुक जशजशी जवळ येऊ लागली आहे, तसे राजकारण तापण्यास सुरवात झाली आहे. अनेक इच्छुकांची तिकीटे कापली जाणार असल्याने ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता पुण्यातील कसबा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी आमचं पण ठरलंय, कसब्यात बाहेरचा उमेदवार नकाे असे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून 21 तारखेला राज्यात मतदान हाेणार आहे. विविध पक्षांकडून आता उमेदवारी जाहीर हाेण्यास सुरुवात झाली आहे. 4 ऑक्टाेबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. पुण्याच्या कसबा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गिरीश बापट हे आता खासदार झाल्याने कसब्याची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे भाजपाचे अनेक उमेदवार या जागेवरुन निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. त्यातच पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक यांना या भागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कसब्यातून निवडणूक लढविण्यास उत्सुक असल्याचे बाेलले जात आहे.
दुसरीकडे काॅंग्रेसमध्ये देखील या मतदारसंघामध्ये अंतर्गत गटबाजी असून या मतदारसंघात काॅंग्रेसचा दुसरा नगरसेवक इच्छुक आहे. त्याला स्थानिक नगरसेवकाचा विराेध असल्याचे समजते. त्यामुळे हे फ्लेक्स नेमके लावले काेणी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु या फ्लेक्समुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.