आमचं जगुन मरण झालं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2015 04:14 AM2015-07-24T04:14:41+5:302015-07-24T04:14:41+5:30
‘गाव गेला... आमचं खूप हाल झालं. आमचं जगुन मरण झालं’, अशी संतप्त प्रतिक्रिया माळीण दुर्घटनेत अंशत: बाधित झालेल्या कुटुंबातील भामाबाई हरिश्चंद्र झांजरे यांनी व्यक्त केली.
नीलेश काण्णव , घोडेगाव
‘गाव गेला... आमचं खूप हाल झालं. आमचं जगुन मरण झालं’, अशी संतप्त प्रतिक्रिया माळीण दुर्घटनेत अंशत: बाधित झालेल्या कुटुंबातील भामाबाई हरिश्चंद्र झांजरे यांनी व्यक्त केली.
माळीण दुर्घटनेत ४४ कुटुंबं व यातील १५१ लोक पूर्ण गाडले गेले तर १६ कुटुंबातील लोक वाचले. मात्र, त्यांची घरे बाधित झाली. पूर्ण गाडल्या गेलेल्या घरांना शासनाकडून भरघोस मदत मिळाली. परंतू बाधित झालेल्या कुटुंबांची मात्र परवडच झाली.
माळीण दुर्घटनेत शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत या शासकीय इमारती व १६ घरे व यातील लोक वाचले. या घरांनाही भविष्यात धोका पोहोचू शकतो, म्हणून जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक घरावर ‘हे घर धोकादायक असून येथे राहू नये’ अशा नोटिसा लावल्या. त्यामुळे येथील कुटुंबांना दुसरा निवारा पाहावा लागला. पूर्ण बाधीत झालेल्या ४४ कुटुंबांना शासनाकडून तसेच सेवाभावी संस्था व वैयक्तिक लोकांनी भरपूर मदत केली.
शासनाने माळीण फाट्यावर ४० तात्पुरती निवारा शेड बांधली. यामध्ये प्रथम पूर्ण बाधित कुटुंबांना प्राधान्य देण्यात आले. नंतर काही अंशत: बाधित कुटुंबाना शेड मिळाली. त्यामुळे बरेच दिवस या अंशत: बाधित कुटुंंबांना बाहेर इतरत्र राहून दिवस काढावे लागले. त्यांची वाचलेली जनावरे ठेवण्यास कुठेच जागा मिळाली नाही. त्यामुळे या लोकांनी शेवटी याच वाचलेल्या घरांमध्ये ही
जनावरे बांधण्यास सुरुवात केली. शासनाने २ हजार ७०० रुपये जाहीर केले. तेही अजून मिळालेले नाहीत. त्याचबरोबर अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्यदेखील मिळाले नाही. त्यामुळे या कुटुंबांची परवडच झाली.