‘आमचे आम्ही’कडे साय-फाय करंडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 02:38 AM2018-12-18T02:38:49+5:302018-12-18T02:39:10+5:30
सायबर सुरक्षेवर आधारित थीम : ‘एफ ५७’ला द्वितीय आणि ‘कम्युनिकेशन एरर’ला तृतीय क्रमांक
पुणे : सायबर सुरक्षेच्या गरजेविषयी सादर झालेल्या एकाकिंका स्पर्धेत ‘आय अँग्री’ (आमचे आम्ही) या एकाकिंकेने विजेतेपदावर नाव कोरून ‘साय-फाय करंडक’ पटकावला. ‘एफ 57’ (नाट्यसंस्कार) आणि कम्युनिकेशन एरर (स्वप्नपूर्ती क्रिएशन्स, मुंबई) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.
क्विक हील फाउंडेशनने महाराष्ट्र सायबर आणि थिएटर अॅकॅडेमी यांच्या सहयोगाने सकळ ललित कलाघर येथे आयोजित केलेल्या अंतिम फेरीतील विजेत्या संघाची घोषणा करण्यात आली. सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने योजलेल्या या अनोख्या एकांकिका स्पर्धेस स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रातून १०० पेक्षा जास्त प्रवेशिका आल्या होत्या. थिएटर अॅकॅडमीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध रंगकर्मी प्रसाद पुरंदरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, गोवा आणि नागपूर या प्रादेशिक केंद्रांमध्ये आॅडिशन घेऊन अंतिम फेरीसाठी ९ टीमची निवड केली होती. यामधून पुणे येथील ‘आमचे आम्ही’ टीम विजेती ठरली. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते रितेश देशमुख आणि जॅकी श्रॉफ उपस्थित होते, तर विजय केंकरे आणि आनंद इंगळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या वेळी क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे कैलाश काटकर, महाराष्ट्र सायबरचे सचिन पांडकर आणि प्रसाद पुरंदरे यांच्या हस्ते विजेत्या टीमचा सत्कार केला.
करंडकाच्या माध्यमातून जागरूकता
१ कैलाश काटकर म्हणाले, ‘‘प्रकाश जितका तेजस्वी, तितकीच त्याची सावली गडद असते. डिजिटल टेक्नॉलॉजी ही काहीशी या प्रकाशासारखीच आहे. त्याचे लाभ आपण घेतो, तेव्हा त्याचे धोके आणि त्याच्या जोखमा यांची जाणीवदेखील आपल्याला असली पाहिजे.
२साय-फाय करंडकाच्या माध्यमातून अधिक चांगल्या सायबर सुरक्षेच्या गरजेबाबत जागरूकता निर्माण करणे, हा क्विक हील फाउंडेशनचा उद्देश होता.
३ ’साय-फाय करंडक २०१८च्या अंतिम फेरीत विचारप्रवर्तक आणि आजच्या काळाच्या एकांकिका सादर झाल्या, ज्यातून आजच्या डिजिटल-प्रेरित जीवनशैलीचे आणि यूझरसमक्ष असलेल्या जोखमांचे दर्शन झाले.