Video: "सरकारविरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय.." पुण्यात मूक मोर्चाला हजारो शिवप्रेमी सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 09:55 AM2022-12-13T09:55:06+5:302022-12-13T09:56:52+5:30
अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेने मूक मोर्चाची सांगता होणार
पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून मंगळवारी पुणे बंद पाळण्यात येत आहे. बंदबरोबरच आता मूक मोर्चाचेही आयोजन केले आहे. डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडेनऊ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. अलका चित्रपटगृह चौक, लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महालाजवळ जाहीर सभेने मूक मोर्चाची सांगता होणार आहे.
पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ शिवप्रेमी एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांबरोबरच संभाजी ब्रिगेड व अन्य अनेक सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यापारी महासंघ, गणेशोत्सव मंडळे, यांनी पुणे बंदला पाठिंबा जाहीर दिला आहे. भाजपचे मंत्री, पदाधिकारी हेही छत्रपती शिवाजी महाराज, थोर, वंदनीय नेते यांच्याबद्दल सातत्याने अवमानकारक वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे भाजपनेही महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी मोर्चात करण्यात येणार आहे.
यांचाही असणार सहभाग
छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे तसेच राज्यातील अन्य नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली. तसेच गणेश मंडळांचा पाठिंबा आहे. शहरातील नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले.