‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’, एक दिवसात बैठका उरकून राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना

By राजू इनामदार | Published: October 7, 2024 06:29 PM2024-10-07T18:29:13+5:302024-10-07T18:29:41+5:30

राज्यातील किमान १२० जागा लढवण्याची तयारी ते करत असल्याची चर्चा मनसे वर्तुळात आहे

We have to win start preparing Raj Thackeray left for Mumbai after completing meetings in a day | ‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’, एक दिवसात बैठका उरकून राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना

‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’, एक दिवसात बैठका उरकून राज ठाकरे पुण्याहून मुंबईला रवाना

पुणे: दोन दिवसांचा दौरा एकाच दिवसाचा करत दुपारपर्यंत पश्चिम महाराष्ट्र, पुणे जिल्हा व पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघांच्या बैठका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी ४ वाजताच मुंबईला रवाना झाले. ‘जिंकायचेच आहे, तयारीला लागा’ असा आदेश त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकांमधून दिला.

१३ ऑक्टोबरला त्यांनी मुंबईत पक्षाच्या गटप्रमुखांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे राज ठाकरे सोमवार व मंगळवार असे दोन दिवस पुण्यात थांबणार होते. रविवारी सायंकाळी ते नाशिकहून पुण्यात आले. सोमवारी सकाळी एक जाहीर कार्यक्रम केल्यानंतर लगेचच त्यांनी पक्षकार्यालयाजवळच्या एका सभागृहात बैठकांचे सत्र सुरू केले. पश्चिम महाराष्ट्र, पुणे जिल्हा तसेच पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका त्यांनी घेतल्या.

पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे तसेच शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, बाबू वागसकर, अभिजित पानसे व अन्य नेते यावेळी त्यांच्या समवेत होते. पुण्यातून शहराध्यक्ष साईनाथ बाबर, अविनाश जाधव, अजय शिंदे, हेमंत संभूस, गणेश सातपुते, किशोर शिंदे हे उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांकडून राज यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची माहिती घेतली. पुणे जिल्हा व पुणे शहरातील काही पदाधिकाऱ्यांबरोबरही त्यांनी विधानसभा मतदारसंघांच्या अनुषंगाने चर्चा केली.

विधानसभेत आपल्याला जोरात प्रवेश करायचा आहे. लढवणारी प्रत्येक जागा जिंकायचीच या इर्ष्येने काम झाले पाहिजे. त्यामुळे आतापासूनच सगळे तयारीला लागा असे राज यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले. दुपारी ४ वाजता ते मुंबईला रवाना झाले.

मुंबईत १३ ऑक्टोबरला राज्यातील पक्षाच्या सर्व गटप्रमुखांचा मोठा मेळावा मनसेने आयोजित केला आहे. राज या मेळाव्यात निवडणूक विषयक बोलणार आहेत अशी माहिती मिळाली. सध्या त्यांचा राज्याचा दौरा सुरू आहे. राज्यातील किमान १२० जागा लढवण्याची तयारी ते करत असल्याची चर्चा मनसे वर्तुळात आहे.

Web Title: We have to win start preparing Raj Thackeray left for Mumbai after completing meetings in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.