माती संवर्धनासाठी जागतिक धोरण हवे; सद्गुरू यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 05:40 AM2022-06-15T05:40:47+5:302022-06-15T05:41:11+5:30

‘मातीच्या संवर्धनासाठी सध्या जागतिक स्तरावर धोरणाची गरज आहे. राज्याच्या व देशांच्या सीमांवरील वाद ही केवळ एक मानवी समस्या आहे. आपण सोयीसाठी एक रेषा आखतो आणि तीच योग्य आहे, असे समजतो.

We need a global strategy for soil conservation says Sadguru in lokmat save soil event | माती संवर्धनासाठी जागतिक धोरण हवे; सद्गुरू यांचे आवाहन

माती संवर्धनासाठी जागतिक धोरण हवे; सद्गुरू यांचे आवाहन

Next

पुणे :

‘मातीच्या संवर्धनासाठी सध्या जागतिक स्तरावर धोरणाची गरज आहे. राज्याच्या व देशांच्या सीमांवरील वाद ही केवळ एक मानवी समस्या आहे. आपण सोयीसाठी एक रेषा आखतो आणि तीच योग्य आहे, असे समजतो. पृथ्वी एक केक आहे आणि त्या केकचा एक तुकडा घेऊन आपली जबाबदारी संपली, असे समजत असाल तर ते योग्य नाही. सूक्ष्मजीवांचे जीवन ही एक जागतिक प्रक्रिया आहे. त्यामुळे माती वाचवा (सेव्ह सॉईल) ही चळवळ सध्याचे धोरण बदलण्याचा एक जागतिक प्रयत्न आहे,’ असे प्रतिपादन सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी केले. 

जगातील २६ देशांचा दौरा करून आलेल्या सद्गुरूंनी माती संवर्धनाचा जागर करण्यासाठी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर पुणेकरांशी संवाद साधला. यावेळी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ग्राविटास फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, गोयल गंगा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल, सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, टॉपवर्थ ग्रुपचे अध्यक्ष अभय लोढा, यूपीएल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय श्रॉफ उपस्थित होते.

सद्गुरू म्हणाले, ‘माती आपल्या भौतिक अस्तित्वाचा स्त्रोत आहे. मातीत अब्जावधी सूक्ष्मजीव असतात. त्यांचे जीवन एक जटील प्रक्रिया आहे. ती वाढत गेल्यानंतर एक जीवन तयार होते. त्यामुळे मानवाच्या जीवनाचे मूळही त्यातच आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी कवक, अल्गी यांनी सूर्यप्रकाशापासून अन्न कसे तयार होते, ते शोधून काढले. त्यालाच आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. त्यावेळी वातावरणात केवळ एक टक्का ऑक्सिजन होता. आता तो २१ टक्के आहे. हे केवळ प्रकाश संश्लेषणामुळे झाले. मात्र, गेल्या हजार वर्षांत पृथ्वीवरील ८५ टक्के प्रकाश संश्लेषण नष्ट झाले आहे.’ माती ही आपली माता; पण आपण मातीला साधन (रिसोर्स) मानायला लागलो आहोत, अशी खंत व्यक्त करत ते म्हणाले, अनेक देशांनी मातीला एक निष्क्रिय वस्तू गृहित धरले आहे. आपल्या देशातही हीच परिस्थिती आहे. 

जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज
- सध्या देशात व जगभर असहिष्णूता व द्वेषाचे वातावरण आहे. त्यावर तुम्ही काय उपाय सुचवाल, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘देशांमधील तसेच समाजातील तणावाबाबत बोलायचे झाल्यास सध्याचे वातावरण गेल्या हजार वर्षांपेक्षा चांगले आहे. इतिहास तपासा. 
- तेव्हाच्या तुलनेत आपण आता शांततेत व सौहार्दाने जगत आहोत. सध्याचा तणाव फक्त टीव्हीच्या स्टुडिओमध्ये दिसतो. तुम्ही जर पुण्याच्या रस्त्यांवरून फिरलात तर तुम्हाला हा तणाव दिसणार नाही. 
- देशातही तीच स्थिती आहे. काही विघ्नसंतोषी लोकांना अवास्तव महत्त्व दिले जाते. हे चुकीचे आहे. मीडियाने सकारात्मक गोष्टींची गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे. जुन्हा जखमांवरील खपल्या काढत बसू नये.’

सद्गुरूचा तरुणांसारखा उत्साह थक्क करणारा आहे. जनजीवनात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. राष्ट्रप्रेम आणि विश्वप्रेमातून त्यांनी अनोखे चैतन्य निर्माण केले आहे. लहान मुले, मोठी माणसे असोत, राजकारणी असोत की कलाकार, प्रत्येक संवेदनशील माणसाला त्यांनी सामावून घेतले आहे. झोपलेल्या समाजाला, व्यवस्थेला सद्गुरुंनी जागे केले आहे. आपल्या देशात सद्गुरुंची कमतरता नाही. मात्र, खऱ्या अर्थाने सद्गुरू होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सद्गुरुंनी कायम कृतीला महत्त्व दिले आहे. संपूर्ण विश्व प्रकाशमान करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. सद्गुरुंच्या ‘माती वाचवा’च्या चळवळीत आता ‘लोकमत’ परिवारही सहभागी झाला आहे. कोरोना काळात रक्तदानाच्या माध्यमातून ‘लोकमत’ने राज्यभरात मोठी चळवळ उभी केली. त्याचप्रमाणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि माती वाचविणे यासाठी ‘लोकमत’तर्फे यापुढेही नक्कीच पुढाकार घेतला जाईल.
- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत.

Web Title: We need a global strategy for soil conservation says Sadguru in lokmat save soil event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे