कायद्यातील तरतुदीपेक्षा आम्हाला समाजाने स्वीकारणे जास्त गरजेचे : सोनाली दळवी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 08:12 PM2020-01-06T20:12:14+5:302020-01-06T20:15:33+5:30
आपल्याकडे लग्न जुळवताना जन्मकुंडली बघण्यापेक्षा मुलामुलींचे 'एचआयव्ही स्टेटस' बघणे जास्त आवश्यक
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने ३७७ कलम रद्द केले असले तरी कायद्यातील तरतुदी पेक्षा आम्हाला समाजाने स्वीकारणे जास्त गरजेचे आहे. एडस सारखा असाध्य रोग फक्त तृतीयपंथी किंवा समलिंगी लोकांनाच होतो हा समाजातील गैरसमज दूर होण्याची गरज आहे. आपल्याकडे लग्न जुळवताना कुंडली, देवक या गोष्टी बघण्यापेक्षा मुलामुलींचे 'एच आय व्ही स्टेटस' बघणे जास्त आवश्यक आहे असे मत तृतीयपंथी कार्यकर्ती सोनाली दळवी यांनी व्यक्त केले.
'थँक्यू सोनाली' या लघुपटामधे दळवी यांनी रक्तदात्याची भूमिका केली असून, त्या वैयक्तिक जीवनातही नियमित रक्तदाता आहेत. या लघुपटाचे प्रसारण आणि त्याचबरोबर लघुपटातून दिलेल्या सामाजिक संदेशासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या चर्चात्मक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हा ११ मिनिटांचा हा लघुपट तृतीयपंथींचे हक्क, रक्तदान आणि एच आय व्ही पॉझिटिव्ह या विषयावर आधारित आहे. या कार्यक्रमात पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीचे व्यवस्थापक महेंद्र वाघ, महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी, पुणे जिल्ह्याचे कार्यक्रम व्यवस्थापक प्रसाद सोनावणे, रक्तदान शिबिर आयोजिका डॉ. ज्योती शिंदे, लघुपटाचे दिग्दर्शक सचिन बिडवई आणि कलाकार राजवीर पाटील सहभागी झाले होते. या मान्यवरांशी लेखक / समीक्षक राज काझी यांनी संवाद साधला.
डॉ. ज्योती शिंदे यांनी महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिन ची मात्रा योग्य प्रमाणात असेल तर त्या नियमितपणे रक्तदान करू शकतात. इतर सर्व क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-या महिला रक्तदान करण्यासाठी मात्र पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रसाद सोनावणे यांनी या वर्षीच्या संकल्पनेविषयी सांगितले. 'नो युवर स्टेटस' आणि ' समाज बदल घडवतो' या दोन संकल्पनांवर आधारित विविध उपक्रम जनजागृती साठी जिल्हास्तरीय राबविले जाणार आहेत. शरीरस्वास्थ्यासाठी नियमितपणे सर्व प्रकारच्या शारीरिक तपासण्या करण्यासाठी जागरूक असलेला नागरिक 'एच आय व्ही चाचणी' साठी मात्र तेवढा जागरूक नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. एच आय व्ही ची लागण झालेल्या या अथवा एड्सग्रस्त रुग्णाला आपुलकीची आणि प्रेमाने स्वीकारण्याची गरज असते. या रुग्णांना स्पर्श केल्याने हा रोग होत नाही. त्यामुळे या रुग्णांना अस्पृश्य असल्यासारखी वागणूक देणे अत्यंत चुकीचे आहे. एच आय व्ही संदर्भात नागरिकांना कोणतीही माहिती हवी असल्यास १०९७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सोनावणे यांनी या वेळी केले.
....
माझ्यासमोर एका तृतीयपंथी व्यक्तीस मॉल मध्ये प्रवेश नाकारण्यात आला या एका घटनेवरून मला या लघुपटा साठी विषय सुचली. समाजामध्ये अनेक स्तरांवर तृतीयपंथीयांना विविध कारणासाठी नाकारले जाते. अगदी रक्तदाना सारख्या पवित्र आणि सामाजिक बांधिलकी जपणा-या उपक्रमांमध्ये सुद्धा त्यांना प्रवेश दिला जात नाही ही वस्तुस्थिती या लघुपटातून दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे- सचिन बिडवई, युवा दिग्दर्शक