"एका गाडीमागे ३०० रुपयांचा हप्ता देतो, आम्ही कशाला घाबरू", रिक्षाचालकांचे अजब समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 03:35 PM2022-12-15T15:35:41+5:302022-12-15T15:36:35+5:30
रिक्षात तीन प्रवाशांना नेण्याची परवानगी असताना सहा प्रवासी नेले जात आहेत.
रोशन मोरे
पिंपरी : ‘एका गाडीमागे २५० ते ३०० रुपये देतो, मग आम्ही कोणाला कशाला घाबरू’ हे वाक्य आहे सहा प्रवासी घेऊन शेअररिक्षाने प्रवास करणाऱ्या चालकांचे. रिक्षाचालकाचा व्हिडीओ ‘लोकमत’कडे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शहरातील अनधिकृत प्रवासी वाहतूक, तसेच रिक्षात तीन प्रवाशांना नेण्याची परवानगी असताना सहा प्रवासी नेले जात आहेत. याविषयी आरटीओ काहीच कारवाई का करीत नाही, गप्प का आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
शहरात मोठ्या प्रमाणात शेअररिक्षाने वाहतूक होते. ही वाहतूक करत असताना आरटीओ कार्यालयाने ठरवून दिलेल्या मार्गावरच शेअर रिक्षाने प्रवासी वाहतूक करणे गरजेचे आहे. मात्र, ही वाहतूक करताना आरटीओने काही नियम ठरवून दिलेले आहेत. त्यामध्ये केवळ तीन प्रवाशांची वाहतूक करण्यात यावी, अंगावर ड्रेस हवा, तसेच जवळ प्रवासी वाहतूक परवाना असावा. मात्र, या साऱ्या नियमांची पायमल्ली करताना रिक्षाचालक दिसून येतात. त्यामुळे प्रवाशांनी कोठे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होतो.
एका रिक्षामागे ३०० ते ६०० रुपये एजंटाला
एका रिक्षाचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आमच्या रिक्षा स्टँडवर तीस रिक्षा आहेत. प्रत्येक रिक्षामागे आम्हाला ३०० रुपये द्यावे लागतात. प्रत्येक महिन्याच्या एक ते सात तारखेपर्यंत आम्ही पैसे गोळा करून आकुर्डीतील एजंटकडे देतो. या रकमेत रिक्षा स्टँडनुसार देखील बदल होतो. कुठे ५०० रुपये घेतात तर कुठे ६०० रुपये. भोसरी-चाकण मार्गावर धावणाऱ्या शेअर रिक्षाचालकांकडून एक हजार रुपये घेतले जात असल्याचा दावा देखील काही रिक्षाचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
ग्रुपने होतोय हप्ता जमा
निगडीतील एका रिक्षाचालकाने सांगितले की, आरटीओच्या नावे काही एजंट आमच्याकडून पैसे घेऊन जातात. दर महिन्याला ठरलेली रक्कम आम्ही जमा करतो. आमच्या ग्रुपमध्ये दहा रिक्षाचालक आहेत. एक रिक्षाचालक या दहा जणांकडून हे पैसे गोळा करतो आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला अथवा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित एजंटकडे देतो, या एजंटकडे आमच्या स्टँडवरून धावणाऱ्या रिक्षांची नंबरसह यादी असते. या यादीतील किती जणांचे पैसे आले, याची नोंद या एजंटकडे असते.
दोन्हीकडून वसुली
भोसरीतील एक रिक्षाचालक म्हणाला, तो भोसरी ते पिंपरी आणि पिंपरी ते भोसरी अशी शेअर रिक्षा वाहतूक करतो. त्याच्याजवळ वाहतुकीचा परवाना नाही. त्यामुळे त्याला भोसरीतील एजंटला ३०० रुपये आणि पिंपरीतील एजंटला ३०० रुपये असे महिन्याला ६०० रुपये द्यावे लागतात. ज्यांच्याकडे परवाना नाही, तसेच रिक्षाची कागदपत्रे नाहीत, असे रिक्षाचालक मिळून कारवाईपासून बचाव करण्यासाठी महिन्याला विशिष्ट रक्कम देत असतात.
आमची कागदपत्रे, परवाना ओक्के
आमच्याकडे परवाना तसेच गाडीची सर्व कागदपत्रे आहेत. तो नियमाप्रमाणेच वाहतूक करतो. त्यामुळे त्याला कुठलाही एजंट पैसे मागत नाहीत. पैसे मागणारे एजंट पोलिस, तसेच आरटीओचे नाव पुढे करतात. मात्र, आपण ठाम राहिलो, तर ते काही म्हणत नाही. मी नियमांचे पालन करतो. त्यामुळे मी कोणताही एजंट माझ्याशी संपर्क साधत नाही, असे पिंपरीतील रिक्षाचालकाने सांगितले.
रिक्षाचालकांनी थेट आरटीओ कार्यालयात करावी
नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर नियमितपणे कारवाई केली जाते. जे एजंट रिक्षाचालकांकडे पैशाची मागणी करतात. त्यांची तक्रार रिक्षाचालकांनी थेट आरटीओ कार्यालयात करावी. त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. - अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड