आम्ही काेविशिल्डचा धाेका २०२१ मध्येच सांगितला हाेता; सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:06 AM2024-05-11T11:06:34+5:302024-05-11T11:08:26+5:30
पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने स्पष्ट केले, की हे दुर्मीळ प्रकरण असून त्याचा हा धाेका त्यांनी २०२१ मध्येच स्पष्ट केला हाेता....
पुणे : ब्रिटनमधील आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल कंपनी ॲस्ट्राझेनेका या कंपनीने त्यांच्या लसीपासून थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस) हा 'दुर्मीळ दुष्परिणाम' हाेऊ शकताे हे लंडन उच्च न्यायालयात सादर केलेल्या कायदेशीर दस्तऐवजात म्हटले आहे. त्यानंतर पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने स्पष्ट केले, की हे दुर्मीळ प्रकरण असून त्याचा हा धाेका त्यांनी २०२१ मध्येच स्पष्ट केला हाेता.
भारतात ही ॲस्ट्राझेनेकाची लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केली आणि काेट्यवधी भारतीयांना दिली. ॲस्ट्राझेनेकाने जगभरातील ‘काेविशिल्ड’ ही लस काेराेना साथीच्या आजारानंतर उत्पादित केली हाेती. सीरमने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये असेही म्हटले आहे, की २०२१ आणि २०२२ मध्ये भारताने माेठ्या प्रमाणात लसीकरण केले.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका कोविड-१९ लसीच्या सात जागतिक उत्पादकांपैकी एक होती. त्यांनी ‘काेविशिल्ड’ या लसीचे डाेस उत्पादित केले. सीरमने ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविड-१९ लस उमेदवारासाठी भारतात मानवी चाचण्या घेतल्या आणि नंतर कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी सुमारे एक अब्ज डोस तयार करण्यासाठी स्वीडिश-ब्रिटिश औषध निर्माता ॲस्ट्राझेनेकासोबत करार केला होता.
सीरमने म्हटले आहे की, सुरुवातीपासून म्हणजे सन २०२१ मध्ये पॅकेजिंग इन्सर्टमध्ये थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसह सर्व दुर्मीळ ते अत्यंत दुर्मीळ दुष्परिणाम उघड केले आहेत. जागतिक महामारीच्या काळात आव्हाने असूनही, लशीची सुरक्षितता सर्वोतोपरी उपयुक्त आहे. ॲस्ट्राझेनेकाचे व्हॅक्सझेर्व्हिया असो किंवा स्वतःचे कोविशिल्ड असो, या दोन्ही लशींची लाखो रुपयांची बचत करण्यात महत्त्वाची भूमिका आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.