आम्ही चांगले नाटक देतो, तुम्ही सुविधा पुरविण्याची जबाबदारी का घेत नाही? प्रशांत दामलेंचा महापालिकेला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 02:36 PM2024-08-22T14:36:08+5:302024-08-22T14:36:31+5:30

पुणे महानगरपालिकेने पुण्यातील नाट्यगृहांमधील व्यवस्थेच्या खर्चासाठी किमान १० ते २० कोटी रुपयांची एफडी करून त्याच्या व्याजावर ही सर्व व्यवस्था उभी करावी

We put on a good show shouldnt you be responsible for providing the facilities? Prashant Damle question to the pune Municipal Corporation | आम्ही चांगले नाटक देतो, तुम्ही सुविधा पुरविण्याची जबाबदारी का घेत नाही? प्रशांत दामलेंचा महापालिकेला सवाल

आम्ही चांगले नाटक देतो, तुम्ही सुविधा पुरविण्याची जबाबदारी का घेत नाही? प्रशांत दामलेंचा महापालिकेला सवाल

पुणे : चांगले नाटक देण्याची जबाबदारी आम्ही कलाकार घेत असतो. पण चांगल्या पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेने घ्यायला नको का? असा सवाल सुप्रसिद्ध अभिनेते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केला. नूतनीकरण करताना बाकी खर्च होत आहेतच मात्र, वर नमूद सुविधांवर का खर्च होत नाही, असा प्रश्नही दामले यांनी उपस्थित केला.

बालगंधर्व मंदिर विषयक समस्यांवर गुरूवारी (दि.२२) पुण्यात बैठक झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, पुणे महानगर पालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ, विद्युत विभागाचे उप अभियंते जयदीप अडसूळ, कनिष्ठ अभियंत्या मंगल मारतळेकर, भाग्यश्री देशपांडे देखील उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिरात अनेक प्रलंबित प्रश्नांची यादीच यावेळी दामले यांनी वाचून दाखविल्यानंतर हे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना शिरोळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

दामले म्हणाले, “भावनिकदृष्ट्या बालगंधर्व रंगमंदिर आम्हा सर्व कलाकारांच्या मनाच्या जवळ असून नुकत्याच झालेल्या नूतनीकरणानंतर देखील येथे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने पार्किग सुविधा, स्टेज व सभागृह येथील एसी व्यवस्था, स्वच्छतागृह, कॅन्टीन व लॉजिंग व्यवस्था, आवश्यक मनुष्यबळाची तरतूद, आवश्यक साउंड सुविधा, अद्ययावत मेक अप रूम्स या प्रमुख समस्या आहेत. वारंवार कलाकार या सर्वांबाबत तक्रारी करत असतात. मात्र महानगरपालिकेचे अधिकारी त्याकडे काणाडोळा करीत आले आहेत.” पुणे महानगरपालिकेने पुण्यातील नाट्यगृहांमधील व्यवस्थेच्या खर्चासाठी किमान १० ते २० कोटी रुपयांची एफडी करून त्याच्या व्याजावर ही सर्व व्यवस्था उभी करावी.

शिरोळे म्हणाले, “नूतनीकरणानंतर देखील येथे अनेक समस्या आहेत हे लक्षात आल्यानंतर आज मी स्वत: बालगंधर्व रंगमंदिर येथे भेट देऊन पाहणी केली. पार्किंग, स्वच्छतागृह, एसी व्यवस्था अशा अनेक तक्रारी येथे आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना केल्या असून येत्या आठ ते दहा दिवसात त्यावर काम होईल.” सुनील बल्लाळ यांनी या सर्व समस्या ऐकून घेत येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये निविदा काढून कामाला सुरुवात करू असे आश्वासन दिले.

Web Title: We put on a good show shouldnt you be responsible for providing the facilities? Prashant Damle question to the pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.