मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान आम्हाला एक मंत्री पद मिळावे; रामदास आठवलेंची मागणी
By नितीश गोवंडे | Published: June 29, 2023 07:09 PM2023-06-29T19:09:10+5:302023-06-29T19:09:19+5:30
विरोधी पक्ष एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत
पुणे : मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान आम्हाला एक मंत्री पद मिळावे, विधान परिषद मध्ये जागा मिळावी आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच, दलित वस्ती गावात एका बाजूला असते त्यामुळे तेथील आरक्षणाची रोटेशान पद्धत बंद करून जिथे दलित वस्ती आहेत त्याठिकाणीच आरक्षण मिळावे अशी आमच्या पक्षाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.
प्रत्येक गोष्टीला विरोध करणे चुकीचे
विरोधी पक्ष एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्याचा कोणताही परिणाम मोदींवर होणार नाही. त्यांचे नेतृत्व सक्षम असून ते जगात लोकप्रिय आहे त्यामुळेच त्यांचे अमेरिकेत जोरदार स्वागत झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत ३२५ पेक्षा अधिक जागा आम्हाला मिळतील. विरोधक जितके एकत्र येतील त्याप्रमाणात जनतेपर्यंत मोदी पोहोचतील. वेगवेगळ्या क्षेत्रात भारताने आघाडी घेतलेली असून रोजगार निर्मितीस प्राधान्य देण्यात आले आहे. दहा लाख लोकांना एका वर्षात सरकारी नोकरी देण्याचे काम केले जात आहे. खासगी उद्योगांना प्रोत्साहन दिले जात असून लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. राज्यात उद्योग वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. विरोधकांनी केवळ विरोध न करता सरकारला सहकार्य करणे ही खरी लोकशाही आहे. प्रत्येक गोष्टीला विरोध करणे चुकीचे आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेश मध्ये झालेला हल्ला दुर्दैवी आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. या हल्ल्याचा निषेध करतो. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.