पर्यावरणपूरकतेचा ध्यास घ्यावा, हौदामध्येच बाप्पाला निरोप द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:52+5:302021-09-19T04:12:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची रविवारी मंगलमयी सांगता होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गावागावांत, तसेच नगरपालिका हद्दीत जय्यत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची रविवारी मंगलमयी सांगता होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गावागावांत, तसेच नगरपालिका हद्दीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाकरिता सामाजिक संस्थांनी पुढे येत मूर्ती संकलन केंद्र, तर नदीकाठी आणि गावात विसर्जन हौद ग्रामपंचायतीमार्फत तयार करण्यात आले आहे. नागरिकांनी या ठिकाणी मूर्ती विसर्जन करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घरच्या गणेशमूर्तीचे घरीच विसर्जन करावे, या आवाहनास नागरिकांनीही आठ दिवसांत मोठा प्रतिसाद दिला आहे़. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने तयार केलेल्या फिरत्या विसर्जन हौदात गणेश विसर्जन करण्याबरोबरच गणेशमूर्ती संकलन केंद्रांवर ग्रामस्थांनी मूर्ती दिल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोनामुळे नागरिकांनी यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. विसर्जनाच्या दिवशी पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने अनेक ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, समाजमंदिर, आरोग्य कोठी आदींसह ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्ती संकलन केंद्र कार्यरत करण्यात आली आहेत.
चौकट
निर्माल्य संकलनासाठी कलश
गणरायाच्या विसर्जनाबरोबर निर्माल्यही नदीत किंवा विहिरीत टाकले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात नदी, विहिरीचे प्रदूषण होते. हे प्रदूषण टाळण्याठी ग्रामपंचायतींनी विसर्जनस्थळी निर्माल्य कलश उभारले आहेत.
या कलशात निर्माल्य टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
फिरते विसर्जन हौद
जिल्ह्यातील १३ तालुक्यांत अनेक गावांनी यावर्षी फिरत्या हौदांची संकल्पना राबविली आहे. या हाैदात विसर्जन करण्यास नागरिकांनी पसंती दिल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण टळणार आहे.