"आम्ही १०-१५ वर्षे घालवली, त्याचे काय?", वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती एमपीएससीमार्फत केल्याने नाराजी
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: July 23, 2022 08:57 PM2022-07-23T20:57:24+5:302022-07-23T21:06:41+5:30
राज्य शासनाने नुकतीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : 'आम्ही गेल्या दोन ते 15 वर्षांपासून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील संलग्न रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी पदावर कायमस्वरूपी जागा असूनही कंत्राटी पद्धतीने सेवा बजावत आहोत. कोरोना काळात आम्ही पळून न जाता जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली. मात्र आमच्या या त्यागाचा, अनुभवाचा कुठलाही विचार शासनाने न करता आता आमच्याच ठिकाणी नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती 'एमपीएससी' द्वारे केली जाणार आहे. हे आमच्यावर अन्याय करणारे आहे', अशा भावना राज्यातील 20 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील शेकडो डॉक्टर व्यक्त करत आहेत.
राज्य शासनाने नुकतीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे एमपीएससी ने 427 जगासाठी जाहिरात जरी करून अर्ज मागवले आहेत. सध्या राज्यात 20 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गट अ व ब च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या 572 मान्यताप्राप्त जागा असून त्या ठिकाणी 400 च्या आसपास वैद्यकीय अधिकारी गेल्या दोन ते 15 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. हे अधिकारी वैद्यकीय सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यांना चार - चार महिन्याचा बॉण्ड करून कंत्राटी सेवा करावी लागत आहे.
'एमपीएससी' द्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती जाहीर करताना जे वैद्यकीय अधिकारी आधीपासून कार्यरत आहेत त्यांच्या बाबतीत शासनाने काही एक निर्णय घेतलेला नाही. यामुळे या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजीची लाट पसरलेली आहे. त्यांनी वारंवार सेवेत कायम करून घेण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे केली असतानाही त्यांना अद्याप सेवेत कायम करण्यात आलेले नाही. परंतु आज ना उद्या सेवेत कायम करण्यात येईल या आशेवर हे वैद्यकीय अधिकारी सेवा बजावत आहेत.
या ठिकाणी आहेत हे वैद्यकीय अधिकारी
शासकीय रुग्णालय जसे मुंबईचे जेजे, पुण्याचे बीजे अशा 20 रूग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी, आपत्कालीन अधिकारी (सीएमओ), रक्तपेढी, पोस्ट मॉर्टम, प्रशासन, व्हिआयपी सेवा, महात्मा फुले योजना आदी पदांवर हे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.
एमपीएससी द्वारे नवीन भरती झाल्यावर आहे आमच्यासारखे जे गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बजावत आहेत त्यांचे जॉब जातील. आमच्यापैकी काही एजबार देखील झाले आहेत. काहींनी होम लोन काढले आहे. आता त्यांना गव्हर्नमेंट मध्ये जॉब कसा मिळेल. ओपन कॅटेगरीतील डॉक्टरांना याचा सर्वाधिक फटका बसेल.
- एक वैद्यकीय अधिकारी, बीजे वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून रुग्णालय
वैद्यकीय शिक्षण विभागाने सन 2019 पासून आम्हाला सेवेत कायम करन्यासाठी पाच ते सहा वेळा कागदपत्रे मागवून घेतली पण त्याला पुढे कचऱ्याची टोपली दाखवली. एमपीएससी च्या जाहिरातीमध्ये ओपन साठी वयोमर्यादा 38 तर कॅटेगरीच्या डॉक्टर यांच्यासाठी 43 केली आहे. पण माझ्यासह बहुतांश वैद्यकीय अधिकारी आता एजबार झाले आहेत. माझ्यासह अनेकांची सेवा 15 वर्षे झालेली असतानाही त्याचा कोणताही विचार केला जात नाही. लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल.
- डॉ. आनंद बरगले, अध्यक्ष, मेडिकल कॉलेजेस मेडिकल ऑफिसर असोसिएशन