'आम्ही सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा...'अग्रवाल बाप-लेकाचा चालकावर दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 03:33 PM2024-05-26T15:33:54+5:302024-05-26T15:34:02+5:30
‘तू हा गुन्हा तुझ्या अंगावर घे, आम्ही तुला गिफ्ट देऊ’ असे सांगून अग्रवाल यांनी गंगाराम हेरीक्रुब यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात ‘बाळा’ला वाचवण्यासाठी अग्रवाल बाप-लेकाने विविध मार्गांचा सर्व अवलंब केल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. त्यांच्या या चुकीच्या कृत्यामुळे तीन पिढ्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला आहे. सगळ्या अपराधांचे ठोस पुरावे पोलिसांकडे आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
गेल्या आठडाभरात शहरातील अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. पोर्शे कारखाली दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन बाळाला वाचवण्यासाठी शहरातील धनाढ्य अग्रवाल कुटुंबाकडून शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब केला जात आहे. याच अग्रवाल कुटुंबातील विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल या आरोपींनी त्यांच्या चालकावर खोटा जबाब देण्यासाठी दबाव आणल्याची माहिती समोर आली आहे. गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२, धंदा - चालक, रा. पुणे), असे या चालकाचे नाव असून, त्याने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिस आयुक्तांनी शनिवारी (दि. २५) पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
पाेलिस आयुक्त म्हणाले...
- अग्रवाल कुटुंबीयांनी त्यांच्या चालकाला कसे धमकावले. चालक आपल्या घरी जात असताना सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी त्याला आपल्या गाडीत बसवून घरी नेले. त्यानंतर आरोपींनी गंगाराम हेरीक्रुब याच्याकडून मोबाइल काढून घेतला आणि त्याला घरातील एका खोलीत डांबून ठेवले.
- ‘तू कुठेही जायचे नाही, कोणाशीही बोलायचे नाही. आम्ही सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा’ असा दबाव अग्रवाल बाप-लेकाने चालकावर आणला. ‘तू हा गुन्हा तुझ्या अंगावर घे, आम्ही तुला गिफ्ट देऊ’ असे सांगून अग्रवाल यांनी गंगाराम हेरीक्रुब यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. हे सांगूनही तो ऐकायला तयार नव्हता तेव्हा अग्रवाल बाप-बेट्यांनी चालकाला धमकावले. ‘आम्ही तुला बघून घेऊ’, अशी धमकी त्यांनी ड्रायव्हरला दिली हाेती.
अपहरण, दमदाटी आणि डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा
विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी चालक गंगारामला आपल्या घरात डांबून ठेवले होते. त्याचा मोबाइल फोन काढून घेतल्यामुळे घरच्यांशी संपर्क होऊ शकला नव्हता. आपला नवरा घरी आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी गंगारामची बायको नातेवाइकांना घेऊन अग्रवाल कुटुंबीयांच्या घरी पोहोचली. अग्रवाल कुटुंबीयांनी गंगारामला सोडण्यास नकार दिला, तेव्हा त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाने गंगारामला सोडले. अग्रवाल यांच्या घरातून पत्नीसह बाहेर पडल्यानंतर गंगाराम घाबरला होता; पण पोलिसांनी गुरुवारी (दि. २३) त्याचा जबाब नोंदवून घेतला. शुक्रवारी त्याची प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी सुरेंद्रकुमार अग्रवाल याच्यासह त्याचा मुलगा विशाल अग्रवाल या दोघांवर ड्रायव्हरने दिलेल्या फिर्यादीवरून कलम ३४२, ३६५ आणि कलम ३६८ अंतर्गत अपहरण, दमदाटी आणि डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यानंतर सुरेंद्र अग्रवाल याला पोलिसांनी अटक केली. विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्याला आवश्यक ती प्रक्रिया करून ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
तपास गुन्हे शाखेकडे
या अपघात प्रकरणाचा तपास शुक्रवारी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ड्रायव्हरसह अग्रवाल यांच्या घरी जाऊन पंचनामा केला. ड्रायव्हरला ज्या खोलीत डांबण्यात आले होते, त्यावेळी ड्रायव्हरने जे कपडे घातले होते, ते ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल्याची माहितीही पोलिस आयुक्तांनी दिली.