"आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी" : राष्ट्रवादी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 12:34 PM2019-10-30T12:34:54+5:302019-10-30T12:48:00+5:30
चंद्रकांत पाटील यांनी काेथरुडमध्ये साड्या वाटल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून आज पुण्यात आंदाेलन करण्यात आले.
पुणे : ''आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी'' असे म्हणत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने चंद्रकांत पाटील यांनी साड्या वाटल्याचा निषेध करण्यात आला. पुण्यातील खंडाेजीबाबा चाैक येथे राष्ट्रवादीकडून आंदाेलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील आणि भाजपाच्या निषेधार्थ घाेषणा देण्यात आल्या.
चंद्रकांत पाटील यांनी काेथरुड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांच्या माध्यमातून काेथरुड भागात घरकाम करणाऱ्या महिलांना दिवाळीच्या निमित्ताने साड्यांचे वाटप केले. या साडी वाटपाबाबत अनेकांनी आक्षेप घेतले. मनसेकडून देखील याचा निषेध करण्यात आला हाेता. आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील खंडाेजीबाब चाैकात निषेध आंदाेलन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित आमदार आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित हाेते. कंपनीकडून रिजेक्टेड साड्या वाटल्याचा आराेपही यावेळी करण्यात आला.
''आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी'', ''भ्रष्टाचाराची साडी चंपा साडी'', अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी बाेलताना चेतन तुपे म्हणाले, ''चंद्रकांत पाटील आता एक लाख साड्या वाटत आहेत, याचा अर्थ त्यांनी निवडणुकीच्या काळात काय काय वाटले असेल याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. एका बाजूला पंतप्रधान भ्रष्टाचार राेखण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे यांचे नेते राजराेसपणे भ्रष्टाचार करत आहेत. लाेकांना प्रलाेभणे दाखवत आहेत. यांच्याकडून लाेकशाहीची मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत. पुण्यातील भूखंडाचा जाे भ्रष्टाचार यांच्याकडून करण्यात आला त्यातून यांनी बक्कळ पैसा कमवला आहे. त्यामुळे लाेकांना आता ते फुकट साडी वाटणार आणि पुढची पाच वर्षे राज्याला आणि पुण्याला लुटण्याचा यांचा अजेंडा आहे. एकप्रकारे ''चंपा साडी सेंटर'' यांनी पुण्यात सुरु केले आहे. पाटील यांनी पुणेकरांची माफी मागायला हवी. त्यांची आमदार हाेण्याची सुद्धा पात्रता नाही. त्यांनी राजीनामा द्यावा. मतदारांना मतदानाच्या आधी आणि नंतर प्रलाेभने दाखवणे कायद्याने गुन्हा आहे. याची तक्रार आम्ही निवडणुक आयाेगाकडे करणार आहाेत.''