'पाच हजार हप्ता व फुकट दारू पाहिजे', हॉटेलमध्ये शिरुन तोडफोड करत उकळली खंडणी
By विवेक भुसे | Published: July 31, 2022 03:28 PM2022-07-31T15:28:13+5:302022-07-31T15:28:26+5:30
दरमहा हप्ता व फुकट दारु दिली नाही तर घरात घुसुन जीवे ठार मारण्याची धमकीही दिली
पुणे : शिवणे येथील हॉटेलमध्ये शिरुन दरमहा ५ हजार रुपये हप्त्याची मागणी करुन हॉटेलमध्ये तोडफोड करुन दहशत निर्माण करीत खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी गणेश शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तुकाराम सोपान इंगळे (वय ५५, रा. शिवणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इंगळे यांचे शिवणे येथे अॅपल रेस्टो बार आहे. गणेश शिंदे हा शुक्रवारी रात्री बारमध्ये आला. त्याने फिर्यादी यांना दर महा ५ हजार रुपये हप्ता पाहिजे व फुकट दारू पाहिजे, अशी मागणी केली. फिर्यादी यांनी नकार दिल्याने त्याने बारमध्ये तोडफोड करुन मॅनेजरला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच बार मधील ग्राहकांना शिवीगाळ करुन खल्लास करण्याची धमकी दिली. खुर्च्या व दारुच्या बाटल्यांची तोडफोड केल्याने ग्राहक पळून गेले. त्यानंतर शनिवारी दुपारी शिवणे येथील गावडे केक शॉपसमोर फिर्यादी यांना भेटून त्याने पुन्हा दरमहा ५ हजार रुपये हप्ता व फुकट दारुची मागणी केली. तेव्हा त्याला शांत करण्यासाठी फिर्यादी यांनी २ हजार रुपये दिले. दरमहा हप्ता व फुकट दारु दिली नाही तर घरात घुसुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.