तुम्ही दिल्लीला या तिकडे चर्चा करु ; अर्थमंत्र्याचे पुण्याच्या उद्याेजकाला आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 04:07 PM2019-10-11T16:07:18+5:302019-10-11T16:08:29+5:30
चंद्रकांत पाटील मित्र परिवारातर्फे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. यावेळी त्यांनी एका व्यापाऱ्याला थेट दिल्लीला बातचीत करण्यास येण्याचे आमंत्रण दिले.
पुणे : चंद्रकांत दादा मित्र परिवारातर्फे पुण्यात अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या संवाद कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्याशी संवाद साधला. यात एका उद्याेजकाने जीएसटी व्यापाऱ्यांना काहीसे अडचणीचे जात असून त्यात सुधारणा करण्यात यावी अशी मागणी त्याने केली. त्यावर तुम्ही 23 तारखेला दिल्लीला या मी तुमच्या सर्व समस्या ऐकून घेते असे म्हणत थेट आपल्या पीएला त्यांना अपाॅईंटमेंट देण्यास सांगितले. तसेच व्यापाऱ्याने जीएसटीवर केलेल्या वक्तव्यावर सितारामन काहीशा भडकल्या.
निर्मला सितारामण या पुण्याच्या दाैऱ्यावर हाेत्या. त्यावेळी चंद्रकांत पाटील मित्र परिवारातर्फे त्यांच्या संवादाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते. यावेळी एका व्यापाऱ्याने जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात सुधारणा करण्याची मागणी केली. तसेच आपल्याकडे काही सुधारणा असून त्याचा विचार करण्यात यावा असेही ताे म्हणाला. यावर जीएसटी कायदा हा संसदेत संमत झाला आहे. तसेच राज्यांनी देखील ताे स्वीकारला आहे. त्यामुळे त्याचा आपण आदर करायला हवा असे सितारामन म्हणाल्या. तसेच जीएसटी संदर्भात काही अडचणी असतील तर त्यावर निश्चित चर्चा करण्यास आपण तयार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. व्यापाऱ्याने सांगितलेल्या बाबी सितारामन यांनी ऐकून घेतल्या आणि यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी थेट त्यांनी व्यापारी व त्याच्या इतर सहकाऱ्यांना दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिले. तसेच आपल्या पीएला सांगून त्यांनी 23 ऑक्टाेबरची वेळ सुद्धा देऊन टाकली.
दरम्यान काेथरुड विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ या संवाद कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. परंतु या कार्यक्रमाला खुद्द चंद्रकांत पाटील अनुपस्थित हाेते.