Aam Admi Party: पुण्याला एका प्रामाणिक पक्षाचा पर्याय आम्ही देणार; विधानसभेच्या रणधुमाळीत 'आप' ही असणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 01:24 PM2024-10-09T13:24:35+5:302024-10-09T13:24:56+5:30
पुण्याला गुंडांचे शहर म्हणून नवी ओळख मिळाली असून त्या विरोधात आवाज उठवून आम्ही त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार
पुणे: आम आदमी पार्टी (आप) विधानसभेच्या शहरातील सर्व म्हणजे ८ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तशी घोषणाच पक्षाच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. प्रस्थापित पक्षांच्या निष्क्रियतेमुळेच पुणे शहराच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळेच पुणेकर जनतेला एका प्रामाणिक पक्षाचा पर्याय आम्ही देत आहोत, असा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.
पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर तसेच राज्य सचिव अभिजित मोरे, पुणे शहर प्रवक्ते किरण कद्रे तसेच सतीश यादव, सुरेखा भोसले निरंजन अडागळे, नीलेश वांजळे, प्रशांत कांबळे, रूबिना काजमी , अक्षय शिंदे, संजय कोणे, प्रीती निकाळजे, ॲड. प्रदीप माने व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
बेनकर यांनी सांगितले की आम आदमी पार्टी पुण्यातील सर्व जागा लढविण्यासाठी सज्ज आहे. अनेक समाजघटकांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटन वाढविले आहे. त्यांना पुणेकरांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. सर्वसामान्य पुणेकरांना त्यांच्यासाठी काम करणारा पक्ष हवा आहे हे त्यावरून लक्षात येते. आपकडे नागरिक पर्याय म्हणून पाहत आहेत, असा दावा बेनकर यांनी केला.
पुणे शहर कोयता गॅंग, महिला अत्याचार, युवा बेरोजगार, यात अडकले आहे. सरकार फक्त जातीधर्म वाद आणि भ्रष्टाचारात तल्लीन आहे. शहराला गुंडांचे शहर म्हणून नवी ओळख मिळाली आहे. या सर्व गोष्टींच्या विरोधात आवाज उठवून आम आदमी पक्ष त्यावर पर्याय देण्याचा, त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, असे यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.