इंदापूरच्या केशर आंब्यासाठी आणखी २० ते २५ दिवसांची पाहावी लागणार वाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:24 IST2025-04-16T17:21:13+5:302025-04-16T17:24:38+5:30
चालू वर्षी ही कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आंब्यांच्या बागांचे खत व्यवस्थापन ही व्यवस्थित झाले होते.

इंदापूरच्या केशर आंब्यासाठी आणखी २० ते २५ दिवसांची पाहावी लागणार वाट
इंदापूर : वातावरणातील बदल, थंडीचे कमी प्रमाण, जानेवारी, फेब्रुवारीत वाहिलेली कोरडी हवा या बाबींमुळे आंब्याला तीन टप्प्यांत मोहर आल्याने, तालुक्यात पिकणाऱ्या आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे तालुक्यात सर्वाधिक पिकणारा केशर आंबा स्थानिक बाजारात येण्यासाठी आणखी २० ते २५ दिवसांची वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र आहे.
आंबा तयार होण्याच्या या वाटचालीत, अवेळी पाऊस व वाऱ्याच्या संकटाबरोबर, तुडतुड्याचा प्रादुर्भाव, पिठ्या ढेकूण, खवले कीड ही विघ्ने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संकटांशी सामना करून बाजारपेठेपर्यंत येणाऱ्या आंब्याची आवक कमी असणार आहे. त्यामुळे त्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
आंबा हे वर्षातून एकदाच येणारे फळ आहे. ते वातावरणातील बदलाला वेगाने बळी पडते. साधारणपणे जून, जुलैमध्ये आंब्याचा हंगाम संपल्यानंतर हलकीशी छाटणी घेऊन, फांद्या फुट्ट लागल्यावर पाच वर्षे तयाच्या पुढच्या आंब्याच्या झाडाला शेतकरी पॅक्लोबुट्राझोल या संजीवकाची आळवणी देतात. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आंब्याच्या बागा मोहरल्या जातात.
चालू वर्षी ही कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आंब्यांच्या बागांचे खत व्यवस्थापन ही व्यवस्थित झाले होते. सरासरीएवढा पाऊस ही झाला होता, परंतु वातावरणातील बदल, कमी प्रमाणात पडलेली थंडी, यामुळे आंब्यांना एकाच वेळी मोहर न येता जवळ जवळ तीन टप्प्यांमध्ये मोहर आला. डिसेंबर, जानेवारीमध्ये सुरुवातीच्या मोहराला फळांचा चांगला लाग मिळाला. तथापि जानेवारी फेब्रुवारीमध्ये फुलोऱ्याच्या बागांना मोठ्या प्रमाणात फळ गळतीचा सामना करावा लागला. त्याच कालावधीत वाहिलेल्या कोरङ्ख्या हवेने आंब्याच्या मोहरातर प्रतिकूल परिणाम झाला. याचा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर होणार आहे.
कृषी अनुदानातून १५० हेक्टरवर लागवड गेल्या पाच वर्षात कृषी विभागाच्या अनुदानातून जवळपास १५० हेक्टर आंब्याची लागवड कृषी विभागाच्या अनुदानातून झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवडीसाठी २०१८-१९ पासून सुरू झालेल्या, लहान व सीमांत शेतकऱ्यांसह अनुसूचित जाती, जमाती, महिलांना प्राधान्य देणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेद्वारे फळबागांना तीन वर्षांसाठी अनुदान दिले जाते.
आंब्याच्या लागवडीसाठी पहिल्या वर्षी प्रतिहेक्टर २६ २ हजार ७८१ रुपये, दुसऱ्या वर्षी १६ हजार ६८ रुपये, तिसन्या वर्षी १० हजार ७१२ रुपये, असे अनुदानाचे
स्वरूप आहे. महाराष्ट्र कृषी विभागाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतात. म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ही फळबाग लागवडीसाठी मंजूरी मिळू शकते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीकअंतर्गत ड्रिप सिंचनसाठी उपलब्ध असणारे अनुदान फळबागांसाठी उपयुक्त ठरू शकते, अशी माहिती तालुका कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
९० टक्के आंबा स्थानिक बाजारात
इंदापूर तालुक्यात सुमारे २५० हेक्टर क्षेत्रात आंब्याची लागवड होते. बावडा, भाटनिमगाव, बेडशिंगे, अवसरी, बिजवडी, कालठण, व्याहळी, निमगाव केतकी, कळस या भागांत आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. बहुतांश भागांत केशर जातीच्या आंब्याच्या लागवडीस प्राधान्य दिले जाते. उत्पादित करण्यात आलेला २० टक्के आंबा स्थानिक बाजारात विकला जातो.
यशस्वी आंबा उत्पादनासाठी एकात्मिक रोग, कीड व अन्नव्यवस्थापन योग्य वेळी फांद्याची विरळणी करणे आवश्यक आहे. वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आंब्याच्या बागेभोवती ऊन, वारारोधक वनस्पतीचे कुंपण असणे गरजेचे आहे. - राजेंद्र वाघमोडे, संचालक, म. फुले कृषी विज्ञान केंद्र, इंदापूर