'आपण संसदेत भेटू...' शरद पवारांकडून गिरीश बापट यांच्या प्रकृतीची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 03:26 PM2022-12-26T15:26:45+5:302022-12-26T15:27:17+5:30
खासदार गिरीश बापट आणि शरद पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध
पुणे : खासदार गिरीश बापट श्वसनाच्या त्रासामुळे दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजकीय नेते, मंत्री सर्वच गिरीश बापट यांना भेटून तब्बेतीची विचारपूस करत आहेत. देवेंद फडणवीस यांनीसुद्धा भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गिरीश बापट यांना भेट देऊन 'संसदेत भेटू' असा सल्ला दिला आहे. महिन्याभरात संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे तुम्ही बरे होऊन आपण संसदेत भेटणार आहोत. असे त्यांना सांगितले आहे.
खासदार गिरीश बापट आणि शरद पवार यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या दोघांच्या संबंधाची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात कायम होत असते. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी बालगंधर्व येथील कार्यक्रमावेळी खासदार गिरीश बापट यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बापट यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर आता लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही बापट यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली होती. तसेच बापट यांच्यावरील उपचारांबाबत डॉक्टरांशी चर्चाही केली होती.