'आम्ही त्यांना फिरू देणार नाही', कोणाच्याही दबावाला विधानसभाध्यक्ष बळी पडणार नाहीत-देवेंद्र फडणवीस
By नारायण बडगुजर | Published: May 15, 2023 02:59 PM2023-05-15T14:59:16+5:302023-05-15T14:59:47+5:30
तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा की, तुमची बाजू कमकुवत आहे, म्हणून अशी भाषा वापरणं सुरू आहे
पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या रिजनेबल टाईमचा अर्थ विधानसभेच्या अध्यक्षांना माहीत आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत ते कोणाच्याही दबावाला बळी पडून निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी विविध प्रकल्पांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी थेरगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळाला असला तरी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभाध्यक्ष निर्णय घेणार आहेत. याबाबत विरोधकांकडून आरोप होत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांचे जे काही चाललेलं आहे ते कुठल्या लोकशाहीत बसणारं आहे? विधानसभाध्यक्षांना घेराव करू, आम्ही त्यांना चालू देणार नाही. आम्ही त्यांना फिरू देणार नाही, अशी भाषा विरोधकांकडून केली जात आहे. अशा दबावातून विधानसभाध्यक्ष कधीच निर्णय घेत नसतात. तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा. तुम्हाला हे माहिती आहे की तुमची बाजू कमकुवत आहे, म्हणून अशी भाषा वापरणं सुरू आहे.
रिजनेबल टाईमचा अर्थ समजतो
विधानसभेचे अध्यक्ष निष्णात वकील आहेत, कायदा समजणारे आहेत. ते कुठलंही बेकायदेशीर काम करणार नाहीत. स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालायने रिजनेबल टाईम म्हटलेलं आहे. रिजनेबल टाईमचा अर्थ देखील विधानसभाध्यक्षांना समजतो. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील. कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी अध्यक्ष दबावाला बळी पडणार नाहीत.
नेते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत...
राज्यातील भाजपाचे नेते महत्त्वाचे नाहीत. मोदींशिवाय त्यांना कोणी ओळखत नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते. याबाबत फडणवीस म्हणाले, त्यांच्याकरता ते महत्त्वाचे नसतील पण आमच्याकरता ते नेते महत्त्वाचे आहेत.