शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडू - दिलीप वळसे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 03:44 PM2023-11-27T15:44:59+5:302023-11-27T15:45:36+5:30
शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली....
अवसरी (पुणे) :आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारसह पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे उभ्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करून अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पाठवावा असे आदेश सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातील सर्व नियोजित दौरे रद्द करून थेट सोमवारी सातगाव पठार कुरवंडी कोल्हारवाडी थूगाव, भावडी, कारेगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना आर्थिक मदत मिळून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
राज्यात गारपीटी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडणार. आंबेगाव तालुक्यातही मोठया प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून मी स्वतः बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे, असं ते म्हणाले. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावी अशा सुचना राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी दिल्या आहेत.
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार व पूर्व भागातील लोणी, धामणी, वडगावपीर परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी महावितरणचे पोल कोलमडले असून अनेक गावातील, वाडी वस्तीवरील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. महावितरण विभागाने वाकलेले पोल सरळ करावे, तसेच नादुरुस्त तारा दुरुस्त करून विद्युत वीज पुरवठा सुरळीत करून घरगुती वीज व कृषी पंपाची विज सुरू करावी असे आदेशही सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी महावितरण प्रशासनाला दिले आहेत.