संस्थानांच्या सूचनांवर तोडगा काढू, आषाढी वारीच्या नियोजन बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:10 IST2025-04-17T15:07:59+5:302025-04-17T15:10:02+5:30

पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे.

We will resolve the suggestions of the institutes, assures District Collector Jitendra Dudi in the planning meeting of Ashadhi Wari | संस्थानांच्या सूचनांवर तोडगा काढू, आषाढी वारीच्या नियोजन बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ग्वाही

संस्थानांच्या सूचनांवर तोडगा काढू, आषाढी वारीच्या नियोजन बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ग्वाही

पुणे : आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी आळंदी तसेच देहू संस्थानच्या वतीने करण्यात येणाऱ्या सूचनांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात येईल. बैठकीदरम्यान दिलेल्या निर्देशांनुसार कार्यवाहीचा अहवाल संबंधित यंत्रणांनी मे महिन्यातील पुढील बैठकीत सादर करावा. आरोग्य सुविधा, शौचालये, पाणीपुरवठा आदी सर्व सुविधा गतवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे. वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.  

आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पिंपरी चिंचवडचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे उपस्थित होते.

पालखी सोहळा नियोजनाच्या अनुषंगाने यंत्रणांना तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी ही बैठक लवकर आयोजित करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, “यावर्षी वारी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात फिरती ई-टॉयलेट्स ठेवण्यात येणार आहेत. त्यांची स्वच्छता, तेथे पाण्याचा पुरवठा होत आहे किंवा कसे आदी संनियंत्रण करण्याची वेगळी व्यवस्था व पथक नेमण्यात येणार आहे. त्याचे एक मोबाइल ॲप तयार करण्यात येणार असून ही मोबाइल स्वच्छतागृहे ठेवण्यात आलेल्या ठिकाणी क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. ज्यावरून अस्वच्छ स्वच्छतागृहांची छायाचित्रे काढून अपलोड करता येतील. ते प्रशासनास प्राप्त होतील व त्यानुसार स्वच्छतेबाबत नियोजन तात्काळ करणे शक्य होणार आहे.”

यावेळी आळंदी येथील दर्शनबारीच्या अनुषंगाने जमीन आरक्षण, पालखी मार्गस्थ असताना होणारी वाहतूककोंडी, स्वागतासाठी लावण्यात येणारे ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक, पालखी मार्गस्थ असताना तसेच पाण्याचे टँकर भरण्याच्या ठिकाणी अखंड वीजपुरवठा, एनएचएआयने पालखी महामार्गाची अपूर्ण कामे करून घेणे, रस्त्यांची डागडुजी याबाबत चर्चा करण्यात आली. पालखी सोहळ्यात समन्वय अधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

Web Title: We will resolve the suggestions of the institutes, assures District Collector Jitendra Dudi in the planning meeting of Ashadhi Wari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.