नयनतारांना विरोध करणाऱ्यांविरुद्ध ‘हम बोलेंगे’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 01:24 AM2019-01-12T01:24:17+5:302019-01-12T01:24:58+5:30
समाजवादी कार्यकर्ते एकत्र : भाषणाचे जाहीर वाचन
पुणे : भारतीय लोकशाही यंत्रणेला उद्ध्वस्त करण्याचे काम चालू आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा चेपून लोकशाही कमी होऊन हुकूमशाही वाढत आहे. राजकीय लोक धर्म व जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नात आहेत. साहित्य, लेखन, विचार, बोलणे अशा स्वातंत्र्यात राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर होत आहे. असे विचार असणाºया ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या विचारांचे भाषण दाबले गेले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आमंत्रण आणि साहित्य संमेलनासाठी लिहिलेल्या उद्घाटनपर भाषणाच्या बंधनाचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे मत पुरोगामी आणि परिवर्तनवादी, तसेच समाजवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन आणि लोकशाही उत्सव समिती आयोजित नयनतारा सहगल यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी लिहिलेल्या उद्घाटनपर भाषणाचे जाहीर वाचन आणि अभिव्यक्ती चर्चा या हम बोलेंगे कार्यक्रमात हे सर्व बोलत होते. यावेळी स्त्रीवादी विद्या बाळ, काँग्रेसनेते अभय छाजेड, ज्येष्ठ कलावंत अतुल पेठे, साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी आपले विचार मांडले.
राजकरणात वेगळ्या प्रकारची रणनीती चालू झाली आहे. साहित्य संमेलनाचे संयोजक नयनतारा यांना बोलून देत नाहीत. हे एवढ्या खालचे पातळीचे आहेत का? सहगल यांचे आमंत्रण रद्द केले. त्यांच्या या विचारांना दाबले गेले याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे विचार पुरोगामी आणि परिवर्तनवादी चर्चेतून मांडले गेले. काँग्रेसनेते अभय छाजेड म्हणाले, नयनतारा यांच्या संवेदनशील भाषणाने सामान्य जनतेवर एवढा प्रभाव पडेल वाटले नव्हते. असे विचार या ठिकणी ऐकायला मिळाले याचे कौतुक वाटते. साहित्य संमेलन हे हिंदी, इंग्रजी, मराठी चॅनल वर दाखवले जात नव्हते. पण या गोष्टीमुळे त्याची सर्व ठिकाणी चर्चा झाली. एक विद्वान पंडितांच्या मुलीने हे लेखन केले आहे.
सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय...
अतुल पेठे म्हणाले, की कलावंत हे समाजातील सर्व प्रकारच्या गोष्टींची आपल्या साहित्य, लेखन याच्याशी तुलना करत असतात. नयनतारासुद्धा या कलाकारांप्रमाणे आपली भूमिका लेखणीतून सर्वांसमोर मांडत आहेत. लोकशाहीवर विश्वास ठेवणारे कलावंत होतात. हुकूमशाहीवर विश्वास ठेवणारे हमाल होतात. सांस्कृतिक दहशतवाद वाढत आहे.
स्त्रीला नाकारल्याने नाक कापलेय...
आपण पाकिस्तानशी युद्ध करायचा विचारही करू नये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे रद्द होण्यामागे माझा काही हात नाही असे सांगतात. ही महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने फारच लाजिरवाणी गोष्ट आहे. एखाद्या स्त्रीला नाकारता तेव्हा तुमचे नाक कापले गेले हे त्यांना कसे कळाले नाही, असे विद्या बाळ यांनी सडकून टीका केली.
साहित्य संमेलनात येणाºया प्रत्येक माणसाला नयनतारा माहीतच होत्या असे नाही. त्यांचे आमंत्रण रद्द झाले तरी मी जाणार होते. नागरिकांना नयनतारा कोण आहेत, याची ओळख करून देणार होते. पण हे आमंत्रण रद्द झाले व भाषणही होऊन दिले नाही. ही फारच लाजिरवाणी गोष्ट वाटली म्हणून मी गेले नाही.
- विद्या बाळ