प्रस्ताव आल्यास पुण्यातही नाइटलाइफ सुरू करू, आदित्य ठाकरे यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 05:25 AM2020-01-19T05:25:03+5:302020-01-19T05:25:27+5:30
नोकरी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने मुंबईमध्ये ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे.
पिंपरी (जि. पुणे) : नोकरी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने मुंबईमध्ये ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. त्याचप्रमाणे प्रस्ताव आल्यास पुण्यातदेखील ‘नाइट लाइफ’बाबत विचार करू, असे आश्वासन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी दिले.
पिंपरी-चिंचवड येथे खासगी कार्यक्रमासाठी ते आले होते. पत्रकारांशी बोलताना आदित्य म्हणाले, मुंबई येथे रात्रभर वर्दळ सुरू असते. प्रवास करून कामावरून रात्री उशिरा घरी परत येणाऱ्या नागरिकांना खरेदी करता यावी, भूक लागली असल्यास त्याला जेवण सहज उपलब्ध व्हावे. यासाठी रात्रीदेखील शॉपिंग मॉल, दुकाने, हॉटेल सुरू असणे आवश्यक आहे.
त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार असून शासनाच्या उत्पन्नात वाढ होईल. पुण्यातदेखील कामगार, कष्टकरी मोठ्या संख्येने आहेत. त्यांनाही अशी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे.