वीजजोड तोडण्याची मोहीम थंडावणार
By admin | Published: March 19, 2017 03:51 AM2017-03-19T03:51:11+5:302017-03-19T03:51:11+5:30
महावितरणच्या बारामती मंडल अंतर्गत १ हजार ५९ पाणीपुरवठा योजनांचे २८ कोटी ४० लाख रुपये थकीत आहेत. महावितरणच्या वतीने मार्च अखेरचे ‘लक्ष्य’ पूर्ण करण्यासाठी
बारामती : महावितरणच्या बारामती मंडल अंतर्गत १ हजार ५९ पाणीपुरवठा योजनांचे २८ कोटी ४० लाख रुपये थकीत आहेत. महावितरणच्या वतीने मार्च अखेरचे ‘लक्ष्य’ पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली होती. या विरोधात ग्रामीण भागात संताप व्यक्त करण्यात येत होता. त्याची तीव्रता वाढण्याच्या अगोदरच पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीजबिलासाठी ‘सवलत’ देण्यात येणार आहे.
महावितरणच्या बारामती मंडलात बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, शिक्रापूर, केडगाव, रांजणगाव, भोर, सासवड, पुरंदर, जेजुरी, नीरा आदींचा समावेश आहे. महावितरणच्या या कार्यालयांतर्गत १ हजार ५९ पाणीपुरवठा योजनांचे २८ कोटी ४० लाख रुपये वीजबिलाची थकबाकी आहे, अशी माहिती बारामती मंडलाच्या सूत्रांनी दिली. महावितरणने मार्चअखेर थकीत वीजबिलासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली होती. अनेक पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या मोहिमेमुळे ग्रामस्थ हवालदिल झाले होते. या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. याच अनुषंगाने महावितरणचे मुख्य अभियंता (वाणिज्य) भालचंद्र खंडाईत यांनी परिपत्रक पाठवून थकीत वीजबिलाबाबत सवलत दिली आहे. राज्यातील सर्वच पाणीपुरवठा योजनांना ही सवलत लागू होणार आहे. त्यानुसार थकीत बिलाची २० टक्के रक्कम आकारणी, चालू बील आकारणी करून उर्वरित थकबाकी वसुलीसाठी चार टप्पे देण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे. ग्रामस्थांचा रोष वाढण्यापूर्वीच हा निर्णय घेतल्याने ऐन उन्हाळ्याच्या काळात पाणीपुरवठ्यावर येणारी संक्रात टळली आहे. धडक मोहीम राबवूनदेखील आजअखेर ८७ लाख रुपये थकीत वसूल झालेले असल्याचे बारामती मंडलाचे उपव्यवस्थापक जी. पी. ताम्हाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वीजबिल भरणा सवलतीनुसार करा : प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
थकबाकीदार सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी महावितरणच्यावतीने नवीन वीजबिल भरणा सवलत योजना लागू केली आहे. या योजनेतील तरतुदीनुसार बारामती व इंदापूर तालुक्यातील थकबाकीदार संस्थांनी तातडीने देयके अदा करून खंडित वीजपुरवठा पूर्ववत करून घ्यावा. कोणालाही पाणीटंचाईची झळ बसणार नाही, याची काळजी घेतानाच उत्पन्नवाढीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी वसुलीची मोहीम गतिमान करण्याच्या सूचना प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी आज केल्या.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात इंदापूर व बारामती तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, बारामतीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे, इंदापूरचे गटविकास अधिकारी रमेश बिचुकले, महावितरणचे बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर घुमे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे उपस्थित होते.
बारामती व इंदापूर तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या थकीत बिलामुळे महावितरणच्यावतीने संस्थांचा वीजपुरवठा खंडित केला होता. यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. ऐन टंचाईच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. अनेक संस्था एकरकमी थकीत बिलाची परतफेड करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.