"भोंग्यांबाबत मुस्लिम बांधवांशी चर्चा करून निर्णय घेणार", पुणे शहराध्यक्षांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 02:23 PM2022-05-05T14:23:49+5:302022-05-05T15:56:01+5:30
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्याबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे
पुणे : राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्याबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील सभेत त्यांनी भोंगे उतरवण्याबाबत ३ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. आता मात्र ईदच्या मध्ये काही अडचण येऊ नये. म्हणून ४ तारखेपर्यंत भोंगे उतरले पाहिजेत असा इशारा राज यांनी दिला आहे. जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मनसैनिकांना केले आहे. त्यानंतर कालपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मनसैनिकांनी मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्यास सुरुवात केली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवातही झाली होती. त्याचप्रमाणे शहराध्यक्ष आणि प्रमुखांचे शोध पोलीस घेत होते. त्यातच पुण्याचे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर नॉट रिचेबल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. तर माजी शहराध्यक्ष वसंत मोरे बालाजी दर्शनाला गेल्याचे त्यांनी सांगितले होते.
पण आज सकाळी वसंत मोरे यांनी फेसबुकवर आंदोलनात सहभागी असल्याची पोस्ट टाकली आहे. त्यानंतर नॉट रिचेबल असणारे नवनिर्वाचित अध्यक्ष साईनाथ बाबर हेही आता माध्यमांसमोर येऊन बोलले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे मी पोलिसांसमोर आलो नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बाबर म्हणाले, भोंग्यांबाबत मुस्लिम बांधवांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. मशिदींवरचेच नव्हे तर सर्वच प्रकारच्या प्रार्थनास्थळांवरचे भोंगे उतरवले जावे, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे केवळ चार तारीखच नाही तर यापुढेही हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बाबर यांनी सांगितले आहे.
भोंगे काढले नाहीत तर त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू
औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनीच महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले. तसेच प्रबोधनकार ठाकरे, जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे अशा विविध मुद्द्द्यांवरून त्यांनी पवारांना खडेबोल सुनावले. त्यानंतर राज ठाकरे यांनी भोंग्याच्या विषयाला हात घातला होता. रमजान ईदपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची भूमिका घेणार नाही. परंतु त्यानंतर जर मशीदवरून भोंगे काढले नाहीत. तर त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशारा राज यांनी सगळ्यांना दिला आहे.