पशुवैद्यकांच्या मागण्यांबाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:11 AM2021-08-01T04:11:42+5:302021-08-01T04:11:42+5:30
निरगुडसर : पशुवैद्यकांच्या काम बंद आंदोलनाचा दुग्ध व्यवसायाला फटका या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या लोकमत मधील बातमीची दखल खुद्द राज्याचे ...
निरगुडसर : पशुवैद्यकांच्या काम बंद आंदोलनाचा दुग्ध व्यवसायाला फटका या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या लोकमत मधील बातमीची दखल खुद्द राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली असुन पशुवैद्यकांच्या मागणी निवेदन आज पुणे या ठिकाणी स्वीकारले. येत्या मंत्री मंडळ बैठकीत मांडू व सकारात्मक निर्णय घेऊ आश्वासन पुर्ती केली जाईल असे सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी राज्यातील खाजगी पदविकाधारक पशुवैद्यक २२ जुलै पासून काम बंद आंदोलन करीत आहेत त्या आधारे आंबेगाव तालुक्यात पदविकाधारक पशुवैद्यकीय व्यवसायिकांचे असहकार आंदोलन चालू आहे. यामुळे जनावरांना पशुवैद्यकांच्या सेवा मिळणे कठीण झाले असून शेतकरी हतबल झाला आहे. परिणामी दुग्ध व्यवसायाला या काम बंद आंदोलनाचा फटका बसला असून अनेक ठिकाणी उपचारा अभावी जनावरे मरत आहेत. परिणामी पदविका धारक पशुवैद्यकांचा कामाचा ताण वाढला आहे. दुसरीकडे वर्षानुवर्षांपासून शासनाने पशु विभागातील रिक्त पदांची भरती करण्याकडे डोळेझाक केली आहे आहे. त्यामुळे पशुपालकांना सेवा देताना यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे.
--
चौकट
आंबेगाव तालुक्यात शंभर ते दीडशे पशुवैद्यकीय सेवा पुरवणारे पदविकाधारक आहेत. तालुक्यातील सरकारी दवाखान्यात पशुवैद्यक यांचे अनेक वर्षापासून काही ठिकाणी पदविकाधारक यांचे पद रिक्त आहे. पशुधन पर्यवेक्षक यांचे गेल्या दहा वर्षात नविन एकही पद भरण्यात आले नाही. परिणामी शेतकऱ्यांना खाजगी पशुवैद्यक यांवर अवलंबून राहावे लागते आणि त्याच पदविकाधारक सध्या संपावर गेले आहेत त्यांना सरकारने कायदेशीर संरक्षण द्यावे अगर त्यांच्या व्यावसायिक नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कायदा निर्माण करावा असे आव्हान आंबेगाव तालुका पशुवैद्यकीय पशुसंवर्धन दुग्धव्यवस्थापन सेवा संघाचे अध्यक्ष डॉ.संजय भोर यांनी केले आहे.