Chandrakant Patil: पत्रकारांच्या घरांसाठी प्रयत्न करू - चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 06:30 AM2022-09-02T06:30:23+5:302022-09-02T06:31:10+5:30
Chandrakant Patil: पत्रकारांच्या आयुष्यात स्थिरता कशी आणता येईल, त्यावर काम करायला हवे. पत्रकारांना घरे द्यायला हवीत, असे मत उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे : पत्रकारांच्या आयुष्यात स्थिरता कशी आणता येईल, त्यावर काम करायला हवे. पत्रकारांना घरे द्यायला हवीत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद हवी. तसेच पत्रकारांची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनाही एखादी फेलोशिप देऊन परदेशातील शिक्षण पाहण्याची संधी देता येईल का? यावर काम करायला हवे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, सुनील माळी उपस्थित होते.
असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल किरण जोशी यांचाही सत्कार झाला. पुणे शहराध्यक्षपदी पंकज बिबवे, सांस्कृतिक विभागपदी संदीप भटेवरा, प्रसिद्धीप्रमुखपदी निवडलेल्या सागर बोधगीर यांचाही सत्कार झाला.
पाटील म्हणाले, पत्रकारिता हे मिशन आहे. त्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. नवख्या पत्रकारांना शिक्षण देण्यासाठी पुणे किंवा मुंबई येथे सेंटर सुरू करता येईल का? याविषयी काही करायला हवे. पत्रकारितेच्या कार्यशाळा हव्यात, त्यासाठी मी प्रयत्न करेन.
बाविस्कर म्हणाले, चंद्रकांतदादा हे अतिशय संयमी, सुसंस्कृत आहेत. विद्यार्थी परिषदेपासून आम्ही ओळखतो. ते सर्वांमध्ये जाऊन काम करणारे आहेत. ते कोल्हापूरचे आहेत की पुण्याचे? हा वाद न घालता ते माणूस म्हणून चांगले आहेत आणि तेच महत्त्वाचे असते.