शनिवारवाडा भोवतालच्या मिळकतींना बांधकामाच्या परवानगीसाठी प्रयत्न करू - रवींद्र धंगेकर
By निलेश राऊत | Published: April 30, 2023 01:32 PM2023-04-30T13:32:16+5:302023-04-30T13:37:08+5:30
शनिवार वाडा कृती समितीतर्फे रविवारी श्रीराम चरणी प्रार्थना व आरती
पुणे: केंद्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याच्या जाचक कायद्यात बदल घडावा व शनिवार वाडा भोवतालच्या सर्व मिळकतींना बांधकामाची परवानगी मिळावी. याकरिता शनिवार वाडा कृती समितीतर्फे रविवारी श्रीराम चरणी प्रार्थना व आरती करण्यात आली.
श्री जोशी राम मंदीर, शनिवार पेठ येथे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. यावेळी शनिवार वाडा कृती समितीचे पांडुरंग करपे, झुंबरलाल खडके, गणेश नलावडे, जितेंद्र निजामपूरकर, स्वप्निल थोरवे, राजेंद्र खराडे, मुरलीधर देशपांडे, मयुरेश पवार यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
यावेळी आमदार धंगेकर यांनी बोलताना सांगितले की, शनिवार वाडा भोवतालच्या तीनशे मीटर मिळकतींना बांधकामाची परवानगी मिळावी व जाचक कायद्यात बदल करावा असे केंद्र सरकारला आवाहन करण्यात आले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, देशातील सर्व खासदार यांना नुकतेच पत्र पाठवून, केंद्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याच्या जाचक कायद्यात बदल करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. श्रीराम प्रभू यांची आरती ही फक्त सुरुवात असून, इथून पुढे कायद्यात बदल व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.