पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 01:29 PM2024-09-22T13:29:36+5:302024-09-22T13:29:48+5:30

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतचं आश्वासन दिलं आहे.

we will try to name the new airport after Jagadguru Sant Tukaram Maharaj says Union Minister Nitin Gadkari | पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन

पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन

BJP Nitin Gadkari ( Marathi News ) : पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले असून या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे.
 
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कमिन्स महाविद्यालय, कर्वेनगर येथे आयोजित जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक अंशुमाली श्रीवास्तव, प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपला इतिहास, संस्कृती आणि वारसा यादृष्टीने महाराष्ट्राचे एक वेगळेपण असून संत महापुरुषांच्या ग्रंथानी, ओव्यांनी आपले जीवन समृद्ध आणि संपन्न केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हे भक्तीमार्ग असून या मार्गाने लाखो वारकरी पायी जातात. वारकऱ्यांच्या सुविधेच्या अनुषंगाने दोन्ही पालखी मार्गाकरीता सुमारे १२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावर संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, श्री विठ्ठल यांच्या प्रतिकृती, विजेची व्यवस्था, वृक्षाची पुर्नलागवड तसेच सुमारे ४२ हजार नवीन झाडे लावण्यात आली आहेत. आगामी काळात स्वयंसेवी संस्था आणि वारकऱ्यांनी या मार्गावर वृक्षारोपण करुन येत्या काळात हरित महामार्ग करण्याकरीता सहकार्य करावे.

दरम्यान, एनएचएआयमार्फत नाशिक फाटा ते खेड, हडपसर ते यवत, कात्रज बोगदा ते रावेत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे ते शिरुर, पुणे ते छत्रपती संभाजीनगर अशी विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात १ लाख ५० हजार कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येतील. याशिवाय पुणे ते सातारा महामार्गाचा नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करुन कामे करण्यात येतील. मुंबई- बेंगळुरू या द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले असून पुण्याच्या वर्तुळाकार मार्गाला याचा लाभ होणार आहे, यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
 

Web Title: we will try to name the new airport after Jagadguru Sant Tukaram Maharaj says Union Minister Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.