Raosaheb Danve: पंतप्रधान मोदींनी आणलेल्या लोकोपयोगी योजनांच्या जोरावर विधानसभा जिंकू; रावसाहेब दानवेंचा विश्वास
By श्रीकिशन काळे | Published: July 21, 2024 01:10 PM2024-07-21T13:10:17+5:302024-07-21T13:10:27+5:30
विरोधकांनी खोटे बोलून लोकांना फसवलं, चुकीचा नरेटिव्ह समोर ठेवला तरी देखील मोदींचे सरकार पुन्हा आले
पुणे : देशात पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आहेत. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मी मांडतो. मोदींनी गेल्या काही वर्षांत अनेक लोकोपयोगी योजना आणल्या आहेत. त्यामुळे त्याच योजनांच्या जोरावर आपण विधानसभा जिंकू, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. भाजपचे अधिवेशन आज बालेवाडीत सुरू आहे. त्यामध्ये दानवे यांनी मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर ते बोलत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
दानवे म्हणाले, आपण १० कोटी लोकांना मोफत गॅस दिलाय. हर घर जल योजना आणली. १४ कोटी लोकांना नळाचे पाणी दिले. शेतकरी यांच्या खात्यात १२ हजार रूपये टाकले जात आहेत. लोकोपयोगी योजना करूनही लोकसभेत आपल्याला पराभव मिळाला. आज सर्व पक्ष एकत्र आले आणि मोदींचा मुकाबला करत आहेत. ते सर्व एकत्र आले तरी मोदी हेच पंतप्रधान आहेत. त्यांचे प्रधानमंत्री सांगू शकले नाही. त्यांच्याकडे नेता नाहीय. आज मोदींचे सरकार आले आहे.
मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आणली. आता लवकरच तिसरा क्रमांक पटकावू. विरोधकांनी खोटे बोलून लोकांना फसवलं. चुकीचा नरेटिव्ह समोर ठेवला. पण तरी देखील मोदींचे सरकार पुन्हा आलेय. जगातले लोकं आपली तारीफ करतात आणि राहुल गांधी लंडनला जाऊन भारतात कायद सुव्यवस्था बिघडली असे म्हणतात. खरं तर यापुर्वी त्यांच्या सरकारने देशात आणीबाणी आणली होती आणि अराजकता पसरवली. या निवडणुकीत त्यांच्याकडे मुद्दाच नव्हता. मग ते म्हणतात संविधान बदलणार. पण भाजप संविधान बदलणार नाही. ते खोटं बोल पण रेटून बोल असं करत आहेत. भारतीय राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलू शकत नाही. आम्ही तो कधीच बदलणार नाही. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. तयारीला लागा. आपल्याला जिंकायचे आहे.