'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 09:37 AM2024-10-01T09:37:31+5:302024-10-01T09:40:40+5:30
Laxman Hake News : काल रात्री पुण्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणी आता हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
Laxman Hake News ( Marathi News ) : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काल रात्री पुण्यात मद्यप्राशन करुन शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. रात्रीच मराठा आंदोलक आणि लक्ष्मण हाके यांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहे. दरम्यान, आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन रात्री नेमकं काय घडलं याची माहिती दिली. तसेच त्यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आरोप केले आहेत.
आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर आरोप केले. लक्ष्मण हाके म्हणाले, काल एक मुलगा मला सायंकाळी पाच वाजता भेटला होता. त्या मते नावाच्या मुलाच्या मोबाईलचे डिटेल्स जरी घेतले तरी यांचा पूर्वनियोजित कट कसा होता हे समोर येईल. ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्याचा हा एक डाव आहे. स्वत:च्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या कोल्हापूरच्या एका नेत्याला मी फक्त कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज यांच्या धोरणाची मी आठवण करुन दिली. छत्रपतींच्या रयतेची आठवण करुन दिली. ते हे सगळं खिलाडु वृत्तीने घेतील असं वाटलं. पण या माणसाने माझ्यावर मारेकरी घातले, असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला.
"मला वाटलं हा नेता खिलाडु वृत्तीने घेईल. त्यावर आत्मपरिक्षण करेल, त्यावेळी कसा कारभार होता हे पाहिलं. पण असं न करता यांनी माझ्यावर मारेकरी घातले. याच नेत्याच्या कोल्हापूरच्या जाधव नावाच्या कार्यकर्त्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या गाडीवरही भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, असंही हाके म्हणाले. "तुम्ही मला एकट गाठता, माझ्यावर मद्यप्राशन केल्याचा आरोप केला. मी रात्रीच माध्यमांसमोर आलो. मेडिकल टेस्ट दिल्या. तुमच्यासारखा भेकड असतो तर पळून गेलो असतो, असा टोलाही लक्ष्मण हाके यांनी लगावला.
'या घटनेमागे कोल्हापूरचा नेता'
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रात्री झालेल्या घटनेवरुन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गंभीर आरोप केले. या घटनेमागे संभाजीराजे छत्रपती आहेत. आम्ही त्यांना राजे मानणार नाही. कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज होते, राजा राजर्षि शाहू महाराज होते. आम्ही यांना राजा मानतो. एखाद्यावर भ्याड हल्ला करायला लावणारा जारा कसा अशू शकतो. त्यामुळे आम्ही त्यांना राजा मानत नाही. मला बदनाम करण्याचा डाव सुरू आहे, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.
"माझ्यावर तलवारीचे वार झाले तरी चालेल पण मी ओबीसीची चळवळ थांबवणार नाही.ओबीसी हक्काची लढाई सुरुच ठेवणार, असंही हाके म्हणाले.